News Flash

कोणत्या विषयातलं मुख्यमंत्र्यांना कळतं?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खोचक प्रश्न

(संग्रहित छायाचित्र)

विद्यमान सरकारने नीतिमूल्ये सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही देणेघेणे नाही. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी टीका केली. कोणत्या विषयातील त्यांना कळतं, असा खोचक सवालही त्यांनी केला.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले वाडय़ाला भेट दिली. त्यानंतर महापालिकेत त्यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

हेक्टर, एकर, पीक कर्ज, सातबारा, एफआरपी यातील त्यांना काय कळते?  साखरेचा विषय आला की जयंत पाटलांकडे पाहतो, महसूलच्या विषयात बाळासाहेब थोरातांकडे पाहतो, असे ते सांगतात. मग तुम्ही काय करता, केवळ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का,  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणतेही पद घेतले नाही. त्यांनी ठरविले असते तर त्यांना ते सहज शक्य होते. मात्र सत्तेसाठी ठाकरे सरकारने नीतिमूल्ये सोडली आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना थोडे प्रशिक्षण द्यावे अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. राज्यातील ९४ लाख हेक्टर क्षेत्राचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने काय नुकसानभरपाई दिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य शिवसेना पक्षप्रवेशावरही त्यांनी भाष्य केले.  एकनाथ खडसे नाराज नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील या चर्चेला काही अर्थ नाही. त्यातही खडसे यांना देण्यासारखे शिवसेनेकडे काही नाही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 1:30 am

Web Title: bjp state president chandrakant patils open question to cm abn 97
Next Stories
1 रेल्वेच्या मोबाइल तिकिटांवर पाच टक्के सूट
2 कॅटमध्ये दहा विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल
3 भाजपाचं ऑपरेशन ‘लोटस’ यशस्वी होणार नाही : थोरात
Just Now!
X