भाजपाची विचारधारा देशाच्या ऐक्याला घातक ठरणारी असून हिंदू आणि मुस्लिम समाजात अंतर निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्यावरून वाद घालण्याचे प्रकार केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भाजपावर केली. या सर्व घडामोडींमुळे देशात वेगळे वातावरण निर्माण झाला आहे. या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकदिवसीय ‘निर्धार विजयाचा, लक्ष 2019’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, देशात साडेचार वर्षे भाजपाचे सरकार आहे. मग इतके दिवस काय केले, असा सवाल पवार यांनी उपस्थित करत निवडणुका आल्या की यांना राम मंदिराची आठवण येते, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनीच आता अन्याय सुरु केला आहे.

दुष्काळातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करत नाही. दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना, यावर सरकार काही पावले उचलताना दिसत नाही. यातून या सरकारची मानसिकता लक्षात येते.

एकीकडे मुख्यमंत्री आरक्षण देतात. तर दुसरीकडे त्याच पक्षाचे प्रमुख तेलंगणात सांगतात की ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे वेडेपणा आहे, ते टिकणार नाही असे सांगतात. आता यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपा विरोधात समविचारी पक्षाची आघाडी अपरिहार्य

मी आज दिल्लीत जात आहे. भाजपा विरोधी पक्षांना एकत्र करण्यासंदर्भात बैठक आहे. ज्या राज्यात ज्या पक्षाला महत्व असेल त्या पक्षाला महत्व द्या. असे मी सांगितले असून नागरिकांना पर्याय हवा आहे. तसा पर्याय आपण देऊ. तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे. मात्र त्या-त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. परंतु, समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे शरद पवार म्हणाले.