आघाडीतल्या नेत्यांवर भाजपाने पक्षांतरासाठी भाजपाने दबाव टाकला असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  राजू शेट्टी यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षांतरावर भाष्य केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले दिग्गज नेते भाजपात गेले आहेत. आघाडीतल्या आऊटगोईंगवरुन राजू शेट्टी यांनी भाजपावर निशाणा साधला. गेल्या पाच वर्षांमध्ये या सरकारने जी आश्वासनं दिली त्याचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर द्या अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली. मी ११ प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं फडणवीस सरकारने महाराष्ट्राला  द्यावीत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आजच भाजपामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीला खिंडार पडल्याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. मात्र आघाडीतल्या या आऊटगोईंगवर राजू शेट्टी यांनी निशाणा साधला. मेगाभरतीची घोषणा सरकारने केली होती. ती मेगाभरती मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाजपात होती असा टोलाही त्यांनी लगावला. ईडी आणि आयटी हे दोन बलदंड कार्यकर्ते भाजपाकडे आहेत. त्यांचा वापर करुन नेत्यांना सांगण्यात येते की तुम्ही कोणत्या पक्षात जायचं. भाजपात गेल्यावर भ्रष्ट नेते पवित्र कसे होतात? याचं उत्तरही सरकारने द्यावं अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? धनगर आरक्षणाचं काय झालं? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत ती दिली नाहीतर या मोर्चापाठोपाठ आम्ही आक्रोश मोर्चा काढू असाही इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.