News Flash

भाजपा उदयनराजेंचा पराभव करण्याची शक्यता : मराठा क्रांती ठोक मोर्चा

पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे हे प्रचंड मतांनी निवडून आले. या निवडणुकीला काही दिवस होत नाही, तोवर उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता 21 तारखेला साताऱ्यात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव भाजपाच करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिली. जर या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व घटनेला भाजप जबाबदार राहिल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी संजय सावंत म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी राज्यभरात मागील तीन वर्षात अनेक ठिकाणी लाखांचे मोर्चा निघाले. त्या मोर्चा दरम्यान 42 जण हुतात्मा झाले, तर हजारो आंदोलनकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या बाजूने सरकार असून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ, असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र त्यापैकी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता आजवर झाली नाही. त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करित आहोत. तसेच या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आता आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत या भाजप सरकारला त्यांची जागा दाखविली जाईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

“सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे प्रचंड मतांनी निवडून आले. या निवडणुकीला काही दिवस होत नाही, तोवर उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे 21 तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची तयारी देखील सुरू झाली आहे. पण ज्या मराठा समाजाची भाजप सरकारने फसवणूक केली आहे. त्याच भाजपात उदयनराजे हे गेले असून भाजपकडून उदयनराजे यांची पोटनिवडणुकीत फसवणूक होण्याची शक्यता आहे,” असे सावंत म्हणाले. “उदयनराजे यांना विजयी करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जर या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाल्यास राज्यभरात गंभीर परिस्थिती निर्माण होईल आणि सर्वाना भाजप जबाबदार राहिल,” असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:50 pm

Web Title: bjp will beat udayan raje bhosale loksabha by elections satara maharashtra jud 87
Next Stories
1 पुणे : पिस्तुल विकणाऱ्या आरोपीसह खरेदी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
2 ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम
3 गुन्हे वृत्त ; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला गंडा
Just Now!
X