भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा

पिंपरी : लोकसभेत शिवसेनेशिवाय लढलो तरी महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० जागा भाजपला मिळतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. जे येतील त्यांच्यासोबत आणि येणार नाहीत, त्यांच्याशिवाय लढण्याची भाजपची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

दानवे म्हणाले, राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये भाजपने कामाला सुरुवात केली असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा ४१ मतदारसंघांचा दौरा पूर्ण झाला आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपला निवडणुका लढवायच्या आहेत. युती आणि जागावाटप याविषयी अद्याप चर्चाना सुरुवात झालेली नाही. तूर्त कोणत्याही मुद्दय़ावरून वाद नाहीत. चर्चेला सुरुवात झाल्यानंतर वादाचे मुद्दे पुढे येतील. समविचारी पक्षांनी एकत्र यावे आणि मतांचे विभाजन टाळावे, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

सवर्णाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, हे विधान शरद पवारांनी कशाच्या आधारे केले माहीत नाही, मात्र घटनेनुसार हे आरक्षण देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

डान्स बार बंद झाले पाहिजेत

न्यायालयाने डान्स बारला यापूर्वीही परवानगी दिली होती. काही कडक बंधने राज्य सरकारने घातली होती. त्या विरोधात चालक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. कोणत्याही परिस्थितीत डान्स बार बंद झाले पाहिजेत, अशी भाजपची ठाम भूमिका आहे, असे दानवे म्हणाले. भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडलेल्या शस्त्रसाठय़ाच्या विषयावर नंतर बोलू, असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.