चिंचवड परिसरातील घटना; एक मोटार, टेम्पो, दोन हातगाडय़ा खाक

महावितरणच्या रोहित्राचा स्फोट झाल्याने अपंग चर्मकार होरपळून मृत्युमुखी पडला. पुणे-मुंबई रस्त्यावर चिंचवड स्टेशनच्या परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. रोहित्राचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत एक मोटार, टेम्पो आणि दोन हातगाडय़ा जळाल्या. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पुणे-मुंबई रस्त्यावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती.

पोपट निवृत्ती बनसोडे (वय ५५, रा.इंदिरानगर, चिंचवड) असे होरपळून मृत्युमुखी पडलेल्या गटई कामगाराचे नाव आहे.चिंचवड स्टेशन परिसरात पोलीस उपायुक्त कार्यालयानजीक महावितरणचे रोहित्र आहे. शेजारी खाद्यपदार्थ विक्रीच्या गाडय़ा आहेत. तेथेच बनसोडे यांचा पादत्राणे दुरुस्तीचा व्यवसाय आहे. पदपथावर वाहनेदेखील लावण्यात येतात. बनसोडे यांची पत्नी शेजारी असणाऱ्या एका मॉलमध्ये कामाला आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक रोहित्राचा स्फोट झाला. त्यातील तेल उडाल्याने बाजूला असणारी वाहने आणि खाद्यपदार्थाच्या गाडय़ांनी पेट घेतला. मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले. काही जण तेथून पळाल्याने बचावले. मात्र, बनसोडे हे अपंग असल्याने त्यांना हालचाल करणे शक्य झाले नाही. यामध्ये ते जागीच मृत्युमुखी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली.

आगीत हातगाडय़ा, एक मोटार, टेम्पो जळाला. गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने पुणे-मुंबई रस्त्यावर कोंडी झाली. बनसोडे हे एका पायाने अपंग होते. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.