दोन भटक्या श्वानांचा मृत्यू

पिंपरीतील वल्लभनगर एसटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक रविवारी सायंकाळी दोन  स्फोट होऊन दोन भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत   मिळू शकली नाही. जिलेटिनच्या कांडय़ांमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एकापाठोपाठ दोन स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली असून बाँबशोधक नाशक पथकाकडून तातडीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.

वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारानजीक रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने एसटी स्थानकाच्या आवारातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सव्वासातच्या सुमारास आणखी एक स्फोट झाला.

एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. तेथे वावरणाऱ्या दोन भटक्या श्वानांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस तसेच अग्निशमन दलाला मिळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच पुणे पोलिसांच्या बाँबशोधक नाशक पथकातील (बीडीडीएस)  जवानांनी तेथे धाव घेतली. एक तासाच्या अंतराने लागोपाठ दोन स्फोट झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

जिलेटिन कांडीचा स्फोट झाल्याचा संशय

तीन वर्षांपूर्वी वल्लभनगर स्थानकाच्या आवारात स्फोट झाला होता. त्यावेळी जिलेटिनच्या कांडीला मांसाचा तुकडा लावण्यात आल्याचे उघडकीस आले होते. रविवारी सायंकाळी झालेला स्फोट अशाच पद्धतीचा असल्याचा संशय आहे. जिलेटिनच्या कांडीला मांस लावून रानडुकरांची शिकार केली जाते. शक्यतो असे प्रकार ग्रामीण भागात होतात. रविवारी सायंकाळी झालेला स्फोट अशाच पद्धतीने घडविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्फोटामागचे कारण निश्चित समजू  शकले नसल्याचे पिंपरी अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले. दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) घटनास्थळाची पाहणी केली आहे. घातपाताची शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.