बसेस थांब्यांवर न थांबणे, त्यांना गर्दी असणे, त्यांचे फलक स्पष्ट न दिसणे.. पीएमपीच्या बससेवेबाबत नागरिकांच्याअशा अनेक तक्रारी असतानाच, अंध व्यक्तींनी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे की, थांब्यावर बस आल्यावर ती कुठली आहे ते ओरडून सांगा!
आम आदमी पार्टीचे (आप) पुण्यातील पदाधिकारी चेंटिल अय्यर यांनी याबाबत माहिती दिली. ‘आप’ तर्फे सध्या पीएमपीच्या प्रवासी सेवेबाबत सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी प्रवाशांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या सर्वेक्षणादरम्यान भेटलेल्या काही अंध व्यक्तींनी याबाबत माहिती दिल्याचे अय्यर यांनी सांगितले.
आपच्या कार्यकर्त्यांना वाघोली येथील बसथांब्यावर माहिती घेत असताना तेथे तीन युवती भेटल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी पीएमपीच्या अनेक समस्या सांगितल्या. त्यांची प्रमुख तक्रार होती, बस आल्याचे आणि गेल्याचे समजत नाही. त्यामुळे कितीतरी वेळ थांबून राहावे लागते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे थांब्यावर बस आल्यावर ती कोणती असेल ती ओरडून सांगावे, अशी विनंती त्यांनी केली. याबाबत प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली आहे.