firasta-blog_ambar-karve-670x200मित्रमैत्रिणीच टोळकं जमवून गावात रस्त्या-रस्त्यावरून रात्रभर गणपती बघत फिरण्याच्या गमतीची सर जगातल्या इतर कुठल्याच ‘जॉइंट अॅक्टिव्हिटी’ला नाही.
लायटिंग डेकोरेशनच्या गणपतीच्या मांडवातल्या ‘बांगो ssss’च्या आरोळीची, ‘आंखे तो खोलो स्वामी’, ‘होठो पे ऐसी बात’च्या घुंगरांची सर सैराटला नाही. ‘शांताबाय’ला तर बिल्कुलच नाय!
फिरून झाल्यावर पुलावरच्या, कोपऱ्यावरच्याच एखाद्या दुकानाच्या पायऱ्यांवर रंगलेल्या गप्पांची सर भल्याभल्यांच्या मैफिलीला हजेरी लावण्यात नाही. स्वतःचे शिक्षण, अनुभव, व्यवसायातलं पद वगेरे सगळं सगळं विसरून विसर्जन मिरवणुकीत मित्रांच्या बरोबर बेधुंदपणे रस्त्यावर नाचण्यातल्या आनंदाची सर अगदी थेटरातल्या कुठल्याही पिक्चरला शिट्ट्या मारण्यातही नाही.
विसर्जन मिरवणुकीत डेसिबलच्या मुद्द्यांकडे एक दिवस ‘कानाडोळा’ करून, पोटात कुठल्याही प्रकारचे ‘इंधन’ नसताना ढोलताशा आणि टोलाच्या अफलातून ‘कॉम्बिनेशनच्या’ तालावर, ३८ नॉनस्टॉप कोळीगीतांवर किंवा ‘अशी चिक्क मोत्याची माळ’च्या ऱ्हिदमवर रात्रभर नाचण्यातली झिंगेची सर गल्लीबोळातल्या डीजेवर ‘टाईट’ होऊन नाचण्यात चुकूनही नाही.
नाचता-नाचता मधेच गर्दीला ‘कंट्रोल’ करण्यात भाव खायची सर इतर कुठल्याही ‘शायनिंग’ मारण्याला नाही.
म्युझिक मध्येच थांबल्यावर ‘बळच’ गलका करून आपल्याएवढ्याच घामेजलेल्या मित्रांची निरर्थक गळाभेट घेण्यातल्या सुखाची सर ‘हाऊ डू यु डू बडी’ म्हणत ‘हग’ देण्यात नाही.
पोटात कावळे कोकलायला लागल्यावर मुख्य रस्त्याच्या गल्लीत एखाद्या घराबाहेर तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्ये आपल्या घरच्यांच्या देखरेखीखाली सुरु केलेल्या ‘सिझनल फॅमेली बिझनेस’ मधल्या घर काम ‘हॉटेल’च्या गरम वडापावची सर ‘मॅकडी’च्या बर्गरला, डॉमिनोजच्या पिझ्झाला कधीच नाही.
तहान लागल्यावर रस्त्यावर सोशल वर्क म्हणून बाकड्यावरच्या प्यालेल्या पाण्याची सर जगातल्या कुठल्याही इतर पेयाला नाही.
लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकीत ‘लायनित’ स्पेशल विसर्जनासाठी तयार केलेल्या भव्य रथांतून एकापाठोपाठ येणाऱ्या श्री भाऊसाहेब रंगारी, जिलब्या मारुती, अखिल मंडईचा शारदा गणेशाच्या देखणी मूर्ती आणि त्यांच्या पाठोपाठ लखलखत्या देखाव्यात रथावर विराजमान होऊन आलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीला हात जोडण्यातले सुख आणि मिळणारया समाधानाची सर कितीही पैसे देऊन, कुठल्याही मंदिरात घेतलेल्या व्हीआयपी दर्शनात नाही.
मिरवणूक टिळक चौकात आल्यावर होणाऱ्या आरतीत, लाखभर लोकांच्या सोबत वाजवलेल्या टाळ्यांची, गणपतीबाप्पाssss मोरयाsssssच्या जयघोषाची सर आलम दुनियेत कशालाच नाही !
हा आनंद ज्यांनी कधीच लुटलाच नाहीत, ते पुण्यात फक्त राहिले, त्यांनी पुणं कधी अनुभवलंच नाही!
फक्त पुण्यातलीच काय? पण ही दृश्य ज्यांनी कमीअधिक फरकानी आपापल्या शहरात, गावात निदान प्रेक्षक म्हणून सामील होऊन बघितली नाहीत, त्यांना सबंध महाराष्ट्राचीच तरुणाई कधी समजली नाही.
त्यांना ‘सर’ द्यायला मज पामराकडे उपमा नाही, त्यांनी घरी बसून आपापल्या कुवतीनुसार वैचारिक वगैरे चर्चा कराव्यात हेच उत्तम…
|| जय गणेश ||
– अंबर कर्वे