काल आज…
तसा मधून मधून येवून भेटून जात होता ह्या वर्षी…
उगाचच न बोलावता…
काहीच गरज नसताना..
कधी नुसतच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा
तर आला की कधीतरी अक्षरशः धुमाकूळ घालायचा
गेला की सगळाच पसारा व्हायचा. सगळीकडे नुसतच अस्ताव्यस्त
सगळेजण त्याच्या अशा येण्यानी वैतागत, चरफडत
तसं गेले काही वर्षे असंच चाललंय त्याचं .
सगळेच जण त्याला कळत नाहीका? असं म्हणून मनातून त्याला शिव्या घालत परत आपल्या कामाला लागायचे
हे असं येणं काय येणं असत का रे पावसा?
आता कोसळेल एक दिवस, कदाचित एकदम अपरात्रीच.
पण सकाळी सकाळी उठल्यावर ह्याखेपेला पूर्वी यायचा तसा ओल्या मातीचा वास नाही येणार. का कोणास ठाऊक? मातीच्या वासाच्या नुसत्या उल्लेखानीही, आठवणी काळ्या ढगांसारख्या दाटून येतात.
वळवाचा पाउस पडायचा साधारण मे महिन्याच्या शेवटी.
आभाळ भरून आलं की घरोघरी शेजारच्यांना हाका मारत, बाहेर दो-यांवर वाळत घातलेले कपडे काढायची, कुठल्याशा गच्चीवरच्या पत्र्यावर अंमळ उशीरच घातल्या गेलेल्या पापड, पापड्यांची वाळवणे काढून आणायची लगबग सुरु व्हायची. काही उत्साही बायका लगेच घरात कै-या, लिंब चिरून नवीन लोणचं घालायच्या तयारीला लागायच्या.
त्या सगळ्या गदारोळात आम्हाला लहान मुलांना मात्र मनसोक्त भिजायची अगदी ‘ऑफिशियली’ परवानगी असायची. त्याच्या पाठीमागे गडबड सुरु असताना मधे मधे तडमड नको हा सुप्त उद्देश असायचाच.
उलट एखादं नतद्रष्ट कार्ट फालतू कारणावरून घरात फुगून बसलेलं असलं, तर त्याला घरातून बाहेर आणायला शेजारच्या काकू, मावशीच बाकीच्या मुलांना मदत करायच्या. ‘घेऊन जारे जरा पावसात भिजा ,सगळी घामोळी निघून जातील’ हे वरून श्यामच्या आईचा अवतार घेत बोललेलं वाक्य ठरलेलं.
मनसोक्त भिजून झाल्यावर पहिला उद्योग म्हणजे, कागदाच्या होड्या करून रस्त्याच्या कडेला वहायला लागलेल्या ‘चहाच्या’ पाण्यात सोडून, त्या जिथे जातील तिथे त्यांच्या मागे मागे धावत जाणे. त्यांचा ‘समुद्री मार्ग’ मोकळा करायच्या निमित्तानी अगदी आगंतूक वाढलेल्या गवत आणि रानझुडपातून हात घालून तो दूर करणे, हा तर एखाद्या तत्पर सैनिकासारखा रोल असायचा.
मग कुठलातरी इब्लीस पोरंगा आसपासच्या बांधकामाच्या साईटच्या वॉचमनला मस्का लावून एखादा गजाचा तुकडा आणायचा आणि अर्धवट ओल्या झालेल्या मातीत खरतर चिखलातच, गजाचा तुकडा (सळई) रुतवत गजपाणी खेळायला सुरुवात व्हायची… पोरं चिखलात अक्षरशः बरबटायची. त्यावेळी मुलींचा फरशीपाण्याचा, झिम्म्यासारखा खेळ रंगात आलेला असायचा.
इंद्रधनुष्य दिसलं तर मग ते पाहण्याच्या निमित्तानी अख्खी बिल्डिंग, कॉलनी रस्त्यावर यायची.
मग कधी ह्या घरी तर कधी त्या घरी सामुदायिक चहापानाचा कार्यक्रम व्हायचा.
त्यातून मुलांच्या नशिबानी कधीतरी बोनस म्हणून गारा पडायच्या, मग तर अधाशी असल्यासारख्या त्या मातीतून वेचून वेचून खायच्या. वरती तोंडी लावायला आईची ‘अगदी बांगलादेशातून आल्यासारखी करतायत पोरं’ असली कौतुकमिश्रित वाक्य हमखास असायचीच. पण मुलांची फक्त चंगळ.
शहराच्या मधोमध, कॉलन्यांच्या कडेनी वाहणारे ओढे, नाले पण उन्हाळ्यातला पडलेला किरकोळ कचरा वाहून गेल्यामुळे कसे स्वच्छ दिसायला लागायचे; त्यात पाय फटाकफटाक करत चालण्यात, त्यातले ते काळे मासे पकडून घरच्या स्वच्छ पाण्याच्या बाटलीत जपून ठेवण्यात उगाचच आपण त्यांचा जीव वाचवल्यासारखा ‘फिल’ असायचा.
त्या पावसानंतर घरी येवून कोमट पाण्याची आंघोळ तर क्या बात है!
त्यादिवशी शुभंकरोतिनंतरच्या परवचाला मात्र वडलांच्या आज्ञेनी शासकीय सुट्टी मिळायची एकंदरीत अगदी कुंभमेळ्यासारखी पर्वणी.
मग जूनच्या पहिल्या आठवड्यात माळ्यावर गेलेले, काही फारच व्यवस्थित माणसांनी कागद, पावडर वगेरे लावून ठेवलेले रेनकोट खाली काढले जायचे. कोप-यावरच्या छत्रीवाल्याकडून आपल्या छत्र्यांची तुटलेली तार बसवून आणायचं काम हमखासच निघायचं आणि ते घरातल्या सगळ्यात मोठ्या मुलाच्या, मुलीच्या गळ्यात पडायचं. मुलांच्या शाळेच्या गणवेशाबरोबर क्वचित पावसाळी चपलेचीही खरेदी व्हायची. इंग्लिश मिडियमवाले तोरा दाखवत गमबुटाची खरेदी करून आल्यावर बाकी मुलांकडे उगाचच ‘डाऊन मार्केट’सारखे बघायचे.
७ जूनला तर कोणाचाच नसेल एवढा, फक्तं आमच्या मान्सूनदादाचा वादा पक्का असायचा .
घरातली पुरुषमाणसं आपल्या ऑफिसमधून वेळेत निघून घरीपण ‘वेळेतच’ पोचायची तीही कुठल्याही रिमाइंडर शिवाय.
मान्सूनच्या येण्याचं दिवाळीच्या एवढच उत्साहात सेलिब्रेशन व्हायचं घरोघरी.
रस्त्यावरून पावसात भिजत जाताना घराघरातून कांदा, बटाटा भजीचे वास दरवळत यायचे, त्याबरोबर फक्कड चहाची सोबत आणि घरातल्या सानथोर मंडळींच्या एकत्र बसून गप्पा.
आता पाऊस पडायला लागला की पहिले व्हॉटसअपवर कुठे ‘बसायचे’? (अर्थ तज्ञ व्यक्तींना विचारावा) ह्याचेच मेसेज सुरु होतात.
थोडे उशिरा ऑफिसच्या बाहेर पडणारे, आपल्या नेहमीच्याच उडप्याच्या डायनिंग बार मध्ये ठराविक ग्रुपबरोबर ,‘चखन्याबरोबर’ ‘क्वार्टरमधला एकेक पेग ’ रिचवत मधून मधून तोंड कडवट करून पावसाकडे बघत, आपल्या बॉसला शिव्या घालतात.
काही फॅमिली ग्रुप्स आपलं ‘मॉन्सूनच’ प्रायव्हेट गेटटूगेदर जेडब्लूएम, ताज ,मेरिडियन पूलसाईडला करत, पाऊस थोडा लांबूनच बघत गप्पा मारत बसतात.
त्यातले जेन्ट्स सिंगल माल्टचा पेग आणि त्याबरोबर मागवलेले कबाब प्लॅटर, तंदुरी घेतात.
तोंडी लावायला ग्लोबल इकॉनॉमी, एचवन बीच्या किवा तत्सम व्हिसाच्या करंट पॉलिसीवर चर्चा असतातच !
काहीजणी मात्र पहिल्यांदा नको नको करत शेवटी रेड, व्हाईट वाईनच्या एखाद्या ग्लासबरोबर माफक चिजचेरी पायनापल खात वंदना लुथ्राच्या डाएटबद्दल किवा शेहनाज हुसेनच्या लेटेस्ट ब्युटीटीप्सबद्दल ‘गॉसिप’ करत बसतात.
चार बाय दहाच्या बाल्कनीत बसून पाऊस बघत, एकट्याच बसलेल्या वयस्कर व्यक्ती स्वतःशीच ‘जरा बघू घरात कुठे ‘लीकेज’ तर नाहीयेना?’ असे म्हणत आपलाच वाडा पाडून मिळालेला ३ बीएचकेचा ‘फ्लॅट’ शोधून येतात. खरंतर त्यांना आपल्या तरुणपणातल्या पावसाचे किस्से ऐकायला कोणी भेटतंय का? हे बघायचं असत, पण ऐकायला सापडत मात्र कोणीच नाही !!
शहाणी मुलं मात्र आपापल्या घरात दिलेला ‘लोअर’ मराठीचा होमवर्क संपवून, पोगोवर छोटा भिम अथवा डिस्नेवर टॉम अॅंड जेरी कसे धावपळ करतात, बिनधास्त उड्या मारतात? हे विस्मयकारक नजरेनी बघत एकीकडे खोखो हसत असतात. ते संपल्यावर त्यांना घरातच ‘मॉमकडून ,चायनीज फूड इन मिनिट्सची ट्रीट’ मिळणार असते.
ह्या सगळ्या भानगडीत आमचा पाउसदादा बिचारा आपला एकटाच रस्त्यांना पाणी घालत, शेवटी कंटाळून एकदाचा थांबतो.
नवीन केलेल्या सिमेंटच्या ऊंच रस्त्यावरून, पाणी धो धो वाहत कडेच्या बिल्डिंग्सच्या पार्किंगमध्ये शिरलेलं असत. पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या गाड्या अर्ध्या पाण्यात गेलेल्या असतात. बिल्डिंगचा एकुलता एक वॉचमन कम सगळ्यांचा ‘कॉमन’ घरगडी ते पाणी परतवून परत रस्त्यावर लावायच्या अयशस्वी प्रयत्नात असतो.
रस्त्यारस्त्यावरच्या खड्यात पाण्याची भलीमोठी थारोळी साचलेली असतात. त्यातून पुढच्या गाडीच्या मागच्या चाकाचा फवारा आपल्या अंगावर उडू नये, म्हणून प्रत्येक दुचाकीवाला गाडी ‘किप सेफ डिस्टंन्स’ न्यायानी चालवत असतो, तर त्यावर सव्वाशेर म्हणून एखादा नुकताच निर्माण झालेला भाई, भाऊ बेमुर्वतपणे रस्त्यावर साठलेला अख्खा चिखलच त्याला ‘ओव्हरटेक’ करत अंगावर उडवून जातो. पावसामुळे घरी जायला उशीर झालेला गृहस्थ मात्र (मनातल्या मनात) त्याला कचकून शिवी घालत, चरफडत पुन्हा आपली दुचाकी सावरून मार्गस्थ होतो.
हे सगळं बघताना माझ्यासारख्याला मात्र अगदी फार जुनं न झालेलं, ८० च्या दशकात अगदी शहरातच जगलेलं बालपण आठवतं. लहानपणी जपून ठेवलेला बंदा रुपया काढून, अंगविक्षेप करत म्हणलेलं ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’, ‘भोलानाथ भोलानाथ पाउस पडेल काय?’ आठवतं.
आनंदानी म्हणण्यासारखे फार काही शिल्लकही राहिलेलं नसतं.
म्हणूनच असेल कदाचित, एक शेर (बहुदा गुलजार साहेबांचा) आठवत राहतो.
”उदास रेहताहै मोहल्ले मे
बारिशोका पानी आजकल..
सुनाहै कागजकी नाव बनाने वाले
बच्चे बडे होगये ..”
– अंबर कर्वे

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना