firasta-blog_ambar-karve-670x200पावसा नमस्कार,
आत्ताच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्ये रे मित्रा तुला. फार ओळखीशिवाय मित्र विनंती स्वीकारत नाहीस म्हणे तू? तरी विनंती पाठवायचं धाडस केलंय. तसाही तू मला ओळखणं अवघडच! पण मी गेली जवळपास ४० वर्षे बघतोय तुझ्या धरतीवरच्या ‘पोस्ट्स’, तुझं इंग्लिश कच्च असेल तर त्यांना पाउलखुणा म्हणू या हवंतर 😉 असो.. तर माझी ओळखच करून द्यायची झाली तर मी तुझ्या छत्रछायेखालच्या कोट्यवधींमधला एक पामर. मी भले गेले ४० वर्षे म्हणतोय खरं, पण तुला मी आठवतोय? म्युचुअल फ्रेंड्स आहेत बघ आपल्यात भरपूर. विधात्याने tag केलेल्या ‘कॉमन मेमरीज’ तर प्रचंडच.
ह्या ‘मेमरीज’वरून आठवतंय मला. आमच्या शाळेची सुरुवात व्हायची बघ, सकाळी शाळेत जाताना हमखास तू बरसत असायचास. रिक्षामधून जात होतो तोपर्यंत, रिक्षात कडेला बसून हुडावरून सोडलेल्या दीड ‘एमएम प्लास्टिक शीटचे’ बंधन बाजूला करत; काही थेंब आत शर्टवर पडायचेच. आधी नको वाटायचं, पण तो अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी अर्धवट ओले झाल्यावर मात्र एवढेसे हात आपोआपच रिक्षाच्या बाहेर यायचे. मग चिमुकल्या ओंजळीत तू पडायचास. टपाटप पडणारे ते मोत्यांचे दाणे हमरीतुमरी करून रिक्षात जागा धरून बरोब्बर मधोमध बसलेल्यांवर टाकण्यात काय सॉलिड गंमत यायची ना? आठवतंय तुला? जरा तुझ्या त्या मोत्याच्या दाण्यांना विचार माझे ते चिमुकले हात आठवतायत का?
पुढे सहावीत असताना सायकलवर शाळेत जायला लागलो. सकाळी तू कोसळताना, ताडपत्रीवाला रेनकोट सावरत पायडल हाणताना, अस्सली चिडचिड व्हायची तुला सांगतो!पण शाळा सुटल्यावर बाहेर आल्यावर हवेत गारवा असायचा. गार वारं सुटलेलं असायचं. शाळेच्या बाहेरच्या त्या मोठ्या चिंचेच्या झाडावर एक मस्त हिरवी लकाकी दिसायची. मी बाहेर आल्यावर तू पण खुश व्हायचास बहुतेक. आठवत नसेलच आता तुला. पण परत तुझा तो रिमझिम आवाज सुरु व्हायचा आणि चिंचेच्या झाडावरून ते परिचित मोत्यांचे दाणेही प्रसन्न होऊन टपटप पडायचे. अशावेळी कोण काढणार दप्तरात ठेवलेला रेनकोट बाहेर? तुझ्या त्या रिमझिम गाजेत घरी परत जाताना, पायडल मारायचे कष्ट जाणवायचेच नाहीत. मज्जा यायची ना? ते मोत्यांचे दाणे पाहिले नाहीत काही वर्षात. पण ते चिंचेचं झाड आहे रे तिथेच. विचारशील त्याला येताजाता कधीतरी?
माझ्यासाठी कॉलेजचे दिवस आणि कामाचे दिवस जवळपास एकत्रच आले. खरं सांगू का? कामाच्या निमित्तानी फिरताना तू पडत असशील तर नको नको व्हायचं. पण इतरवेळी कधी सायकलवर कधी गाडीवर तुझ्या त्या मुक्त सरी, बेधुंदपणे अंगावर झेलत कुठे कुठे भटकलोय? गुरुवारी घरच्यांच्या नकळतपणे लोणावळा, खंडाळा काय किंवा कोसळणाऱ्या पावसात ‘जय भवानी जय शिवाजी’ करत लोहगडावर चढणे आणि येताना भाज्याच्या लेण्यांच्या धबधब्यात मुक्तपणे लोळणे. वरून तू कोसळत असायचास आणि त्या कातळावर बसून तुझे ते अफाट बरसणे मी मनमुराद साजरे करायचो. तीच नशा बास होती आम्हा मित्रांना त्यावेळी. परतीच्या लोकलला भाजलेले कणीस खात मळवलीच्या त्या कच्च्या रस्त्यावरून, चिंब ओल्या झालेल्या मित्रांनी एकमेकांच्या पाठीत गुद्दे घालत आमचे खिदळत जाणे, आठवतंय? त्या पाऊलवाटाही विसरल्या नसतील अजून! विचारशील त्यांना आठवतोय का मी?
नंतर आले ते मित्रमैत्रिणींच्या बरोबर मनसोक्त आनंद घेत केलेले ‘वर्षाविहार’. सिंहगडावर, ताम्हणी घाटात, ठोसेघरच्या धबधब्याच्या आसपास केलेली मनसोक्त भटकंती. बाहेर पडत असलेल्या मुसळधारात एकीकडे तळहातावर घेतलेल्या पिठलं भाकरी, कांदाभजी आणि खरपूस भाजलेल्या त्या कणसांचा वास, तिथल्या आसमंतात अजूनही कुठेतरी दरवळत असेल. त्या भटकंतीत काही मित्रांनी आणि मैत्रिणींनी आपापसात हळूच जुळवून घेतलेल्या रेशीमगाठी. सगळी मित्रमंडळी बरोबर असताना त्यांचे आपापसातले ते किंचित मागे राहून कुजबुजणे. साक्षी आहेत ती सगळीच ठिकाणे. परत बरस एकदा तिकडे आणि विचार त्यांना. आमच्याबरोबरच्या त्या ‘पक्षांची’ कुजबुज तर नक्कीच आठवत असेल त्यांना.
गेल्या काही वर्षांत सहसा तू दिसतोस, तो सिमेंटच्या रोडवर नाहक पडताना आणि कडेनी वाहून जाताना. दुचाकीवर जाणाऱ्या कोणा अनोळख्याच्या अंगावर चिखल होऊन उडताना बघून वाईटच वाटतं. पण तेवढ्यात कुठेतरी शाळेच्या व्हॅनच्या काचेतून, एखादा ओंजळ केलेला चिमुकला हात बाहेर येतो, मग आत बसलेल्या पिल्लांची हसतखेळत चाललेली झटापट दिसते. एखाद्या बाईकवर डेनिमवाल्याला लपेटून त्याच्या कानात काहीतरी सांगणारी पंजाबी घातलेली पोरगी दिसते. कुठेतरी काहीतरी ओळखीचं बघितल्यासारख वाटतं. मन थोडं मागे जातं, खूप कायकाय आठवतं. अशावेळी पावसा पुन्हा तुझी आठवण होते मित्रा! आम्हीच बदललोय ह्याची जाणीवही होते. थोडसं खिन्न व्हायला होतं. तेवढ्यात हातात काठी घेत ‘मॉर्निंग वॉकला’ जाताना, गाडीवरच्या युगुलाकडे निरखून बघणारे पेन्शनर काका दिसतात. त्याही परिस्थितीत हसायला येतं.
तर सांगायचा मुद्दा असा, गेल्या दोन वर्षांत ह्या धरतीच्या ‘साईट’वर तसाही फारसा फिरकला नाहीयेस. तुझ्या सार्वजनिक पोस्ट्सची वाट बघण्यापेक्षा ह्यावेळी सरळ मित्र विनंती पाठवल्ये. तेव्हा आमच्या आनंदासाठी पुन्हा लवकर ये. आपल्या ‘म्युच्युअल फ्रेंड्स’मधली धरण, शेतं, शेतकरी येताजाता तुझी आठवण काढतच असतात. तू ह्या मित्र विनंतीचा स्वीकार करशील आणि आपल्या धरतीच्या साईटवर लवकरच जोरदार हजेरी लावशील अशी खात्री आहे.
तुझा सदैव कृपाभिलाषी
– अंबर कर्वे

तळटीप – सुरुवातीला खरतर ‘डिअर’/प्रिय लिहिणार होतो, पण हे पत्र स(मस्त) मित्रांना माहितीच्या अधिकारात वाचता येणार, त्यातून मग विषयाला भलतेच फाटे फुटणार. त्यामुळे तूर्तास आदराच्या नमस्कारावरच समाधान पावा देवा!