‘फिरोदिया’ म्हटले की पुण्यात कॉलेजमध्ये असलेल्यांना कल्चरलची रेलचेल असणारी ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धा आठवते. उद्योगात आलं की उद्योगपती फिरोदिया कुटुंब, त्यांच्या मालकीची बजाज टेम्पो आता ‘फोर्स मोटर्स’सारखी कंपनी, कायनेटिकसारखी गाडी डोळ्यापुढे येते. पण मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते रमण फिरोदिया वेगळे आहेत. हे पण मालकच आहेत, पण स्वतःचे.
वय वर्षे ७० पूर्ण, त्यामुळे त्यांना निदान माझ्या वयाच्या लोकांनी तरी काकाच म्हटले पाहिजे. पण त्यांचा काम करतानाचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा. त्यांच्या चालत्या फिरत्या दुकानात रोजच्या गरजेच्या किरकोळ गोष्टी असतात. आलेल्या प्रत्येकाला हसतमुखानी हवी ती वस्तू देत राहणे, हा दुकानदारीचा प्राथमिक नियम न चुकता पाळत, त्याचबरोबर अजून काही गरजेच्या वस्तू हव्यात का ते आवर्जून विचारत त्यांचे काम सकाळ, संध्याकाळ सुरु असते. ग्राहक येत जात असतं, हे उन्हाळा असो किंवा पावसाळा… आपल्या फिरत्या दुकानात बसून आपलं काम करतच असतात. हो सांगायचे राहिलं; या माणसाला वयाच्या आठव्या वर्षीच पोलिओ झाला होता. त्यात त्यांचा उजवा पाय आणि उजवा डोळा निकामी झाला. जन्मापासून नगरजवळ एका लहानशा गावात राहिले. पायामुळे शिक्षण घ्यायला शाळेत जाणे अवघड जात असे, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण त्यांना घरीच पुस्तके देवून केले. पण त्यामुळे शाळेचे काही सर्टिफिकेट, दाखला नाही. जरुरीपुरते शिक्षण झाल्यावर मोठ्या भावानी स्वतःच्या औषधाच्या दुकानात त्यांना सामावून घेतलं. काही वर्षांनी ख्यातनाम सर्जन डॉ. संचेती यांनी, लष्करी रुग्णालयात त्यांच्या पायाचे ऑपेरेशन केले. त्यात त्यांच्या पायाला कॅलिपर बसवण्यात आले. त्यामुळे त्यांना निदान कुबड्या घेऊन चालणे शक्य झाले. सुमारे ३०-३५ वर्षे त्यांनी भावाच्या बरोबर दुकानात काम केलं. कालांतराने भावाचेही वय झाले, त्यांच्या ऑपरेशन नंतर त्यांना नाईलाजाने दुकान चालवणे बंद करायला लागले. मग हे सगळेच कुटुंब राहायला पुण्यात आले आणि इथून फिरोदिया काकांचा एक नवीन प्रवास सुरु झाला.
आई आणि वडिलांच्या बरोबर भावाने आयुष्यभराच्या करता दिलेल्या घरात राहायला तर मिळत होते. जेवायला डबा पण मिळत होता. पण त्याच्याबरोबर काही काम न करता, नुसतेच खायचे हे त्यांच्यातल्या उद्योगी स्वभावाला न पटणारे होते. पण भावाला रस्त्यावर वस्तू विकण्याचा व्यवसाय आवडणार नाही, या भीतीने त्यांनी त्याच्या नकळत सुरुवातीला घराच्या आसपास फिरून उदबत्त्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. पण त्याची बातमी लवकरच भावाला समजली. पण भावाने उलट त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ‘जोपर्यंत तू काम करून चार पैसे मिळवतोयस, तोपर्यंत माझा तुला पाठिंबाच आहे’, असं सांगून त्यांना प्रोत्साहनच दिले. मग स्वतःला हवीतशी एक सायकलरिक्षा बनवून घेऊन त्यांनी उत्साहात कामाला नव्याने सुरुवात केली. घराच्या म्हणजे पौडरोडच्या आनंदनगरजवळच आता त्या गाडीत बऱ्याच प्रकारच्या उदबत्त्या, धूप, फुलवाती, समईच्या वाती, अत्तर, गुलाबपाणी यापासून कॅलेंडर, बॉलपेन, रिक्षाचे टेरिफ कार्ड अशा तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू घेऊन ते रस्त्यावर फिरायला लागले.
त्यांच्या बंधूंच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या मदतीच्या बद्दल फिरोदिया काका भरभरून बोलतात. त्यांच्या मदतीशिवाय आपले आयुष्य कधीच जगता आलं नसतं, हे आवर्जून सांगतात. त्या बोलण्यात कृतज्ञता आहे,तेवढेच प्रेमही. तरी एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे, त्यांनी आयुष्यभर फक्त स्वतःच्या भावाच्या दुकानात काम केले होते, त्यांना रस्त्यावर काम करायची सवय नव्हती. अशा व्यक्तीला वयाच्या साठीनंतर रस्त्यावर साध्या वस्तू विकणे केवढे कठीण गेले असेल? पण त्यांची मूळ मारवाडी स्वभावातली उद्योगशीलता आणि दुकानदारीतला अनुभव कामी आला. हळूहळू त्यांच्या चालत्या फिरत्या दुकानातून वस्तू घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांच्या आपुलकीच्या वागण्याने एकदा आलेले ग्राहक त्यांच्याकडे नेहमी यायला लागले. आता तर लोक त्यांची सायकलरिक्षा दिसायची वाट बघतात.
पण शेवटी व्यवसाय म्हटलं की सगळेच लोक चांगले भेटतात असं होत नाही. सहज त्यांच्याकडे बघितलेला अनुभव सांगावासा वाटतो. मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतानाच, त्यांच्याकडे एका वयस्कर बाईंनी कॅलेंडरची चौकशी केली. कालनिर्णयची किंमत २५ रुपये ऐकून त्या म्हणाल्या, आम्हाला २० रुपयाला मिळते. हे ऐकून पण फिरोदिया काकांनी त्यांना ‘अहो मलाच २२ रुपयाला मिळते, तुम्हाला कसे २० रुपयाला मिळेल?’ असा शांतपणे प्रश्न केला. पण त्या बाई तरीही घासघीस करून प्रश्नाचे उत्तर न देता, काहीतरी बडबड करत तिथून निघून गेल्या. मला प्रश्न पडला या बाईंसारख्या व्यक्तींना काहीच संवेदना नसतात का? हीच ती माणसे जी मॉलमध्ये खरेदी करताना बिलाचे पैसे निमुटपणे काढून देतात आणि शेतकऱ्याकडून अर्धा किलो भाजी घेतानाही घासघीस करतात. पण माझ्या मनात आलेली कटुता लवकरच दूर झाली. कारण तेवढ्यात जवळ शिवतीर्थनगरमध्ये रहात असलेला श्रेयस जोशी नावाचा फर्ग्युसनमध्ये वकिली शिकणारा एक युवक तिथे आला. त्याने महिन्याला लागणाऱ्या उदबत्त्या, धूप विकत घेतले. काकांशी दोन शब्द बोलला. त्यांच्याकडे येणारा नेहमीचा ग्राहक आहे हे ओळखून, न राहवून त्याच्याकडे मी फिरोदिया काकांविषयी चौकशी केली. त्याचे उत्तर फार प्रातिनिधिक वाटले मला. तो म्हणाला ‘त्यांच्याकडे तो आणि त्याच्या आसपासचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांची बारीकसारीक सगळ्या गोष्टींची खरेदी ते फिरोदिया काकांकडूनच करतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे एकतर त्यांच्याकडच्या गोष्टींच्या किमती कायमच वाजवी असतात आणि दुसरी म्हणजे त्यांची आपुलकी. ती आपुलकी मोठ्या दुकानात, मॉलमध्ये कधीच आढळत नाही. त्यामुळे एक गोष्ट घ्यायला थांबलेला माणूस, जाताना ३-४ गोष्टी कधी खरेदी करून जातो त्यालाही समजत नाही.’ हे फिरोदियाकाकांचे मी प्रत्यक्ष बघितलेले दुकानदारीतला काही अनुभव. बहुदा त्यांच्या या स्वभावामुळेच आसपासच्या बऱ्याच ऑफिसमध्ये, बँकेत काम करणारे, आवर्जून त्यांच्याकडे येतात, चार शब्द बोलून काहीतरी खरेदी करून समाधानाने परत जातात. तुम्ही कधी पौडरोड भागात गेलात, तर सकाळी १०.३० ते १.३० पर्यंत आणि संध्याकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत ते आनंदनगर परिसरात तुम्हाला त्यांच्या चालत्याफिरत्या दुकानात फिरताना दिसतील. जमलं तर काही वेळ त्यांच्याकडे थांबा, काही नेहमीच्या गोष्टींची खरेदी करून बघा त्यांच्याकडून. एमआरपीपेक्षा जास्ती भाव नाही घेत ते.
आज वयाच्या नव्वदीच्या पुढे वय असलेल्या आपल्या आईवडिलांच्या सोबत भावाने दिलेल्या घरात राहणाऱ्या फिरोदिया काकांना, कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचे मुख्य कारण ते घरीच शिकले असल्याने त्यांच्याकडे शाळेचा दाखला नाही. आधार कार्ड, मतदार ओळखपत्रासारखे पुरावे असतानाही त्यांना एवढ्या वर्षात सरकारी यंत्रणेकडून, तिथल्या ऑफिसमधल्या लोकांचे फक्त वाईटच अनुभव आले आहेत. त्यांचे सहकार्य तर सोडाच पण प्रत्येक योजनेकरता फिरोदिया काकांना किरकोळ कागदपत्र नसल्याने फक्त नकारघंटाच मिळालेली आहे. कोणाहीकडे हात न पसरणाऱ्या माणसाला, त्यातूनच आलेली रास्त उद्विग्नता त्यांच्या बोलण्यात जाणवते. पण ती झटकून टाकत ते आलेल्या ग्राहकाला हसून सामोरे जातात. त्यांच्या गाडीतून जादुगाराने पोतडीतून काढाव्यात अशा एकेक गोष्टी बाहेर यायला लागतात. एकदा अनुभव घेऊन बघा तुम्हीही.
एक सांगू का? फिरोदिया काकांसारखी माणसे म्हणजे मला उदबत्ती सारखीच वाटतात. स्वतः आतून जळत असताना देखील आजूबाजूचे वातावरण प्रसन्न करणारी…
– अंबर कर्वे

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?