firasta-blog_ambar-karve
रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच वाटेल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
भरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा, पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा. खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
हल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते.
तिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून, नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा
तहान तर सगळ्यांनाच लागते ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच.
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
दिवसभर ‘इडियट बॉक्सला’ सुट्टी देऊन, आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान मुलांनाही ऐकवा. पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना? तुमचीही उजळणी होईल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात, दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल, एवढं तरी करून बघा. रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना? फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला..
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय !!
नेहमीची कार सोडून कधीतरी बाईकवर एकटेच निघून बघा मनपसंत हायवेला सुस्साट स्पीडने मोजून करा ओव्हरटेक २०० ट्रक, १०० बसना, त्याच जुन्या उत्साहात. आल्यावर चेहेरा माखलेला असेल धुळीने, धुराने.
शिव्या पण खाल्ल्या असतील ४ गाडीवाल्यांच्या ..
तरी नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
मुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून ‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका’
तो मनाशीच हसेल खुळ्यागत! पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच’! जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता. व्यावसायिक तर तोपण आहे ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
स्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये, त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा विनामतलब तंगड्या हलवत, गाणी म्हणत बसून बघा. एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..
नव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
आपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा. पैसे नाही लागत त्याला जास्त ..
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
ऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर’ फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे, चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर. खरा सुगंध तर तोच ना ?
नंतर सांगा, तुम्हालाच कसं वाटतंय!
‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा,
ती ‘स्त्री’आहे म्हणून नाही, पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून!
हे सगळं तुम्ही आधीपासूनच करत असाल तर क्या बात है!
पण नसाल करत तर नक्कीच करून बघा..
नंतर सांगा, तुम्हाला कसं वाटतंय!!
– अंबर कर्वे