दारे आणि तिजोऱ्या
त्यातून होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या
या झोपडीत माझ्या…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता अनेक वर्षे अभ्यासक्रमात होती. मात्र तशी ती नसतानाही अनेक वर्षे ती लोकांच्या मनात ठाण मांडून आहे. याचे कारण त्यात असलेल्या गरिबीचे गुणगान. गरिबी हा तसा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. पुराणकाळापासून गरीबी हाच भारतीयांच्या जीवनाचा मानदंड बनला आहे. ‘दारिद्र्य भो तु परमं विवेकी, गुणाधिके पुंसां सदानुरक्तम्’ (दारिद्र्या, तू खूप हुशार आहेस, कारण गुणवान लोकांकडेच तू सदा वास करतोस) असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे. म्हणजेच जो गरीब असतो तो चारित्र्यवान असतो, असा व्यत्यास भारतीय माणूस बरोबर काढतो. ‘ऐरावती रत्ने थोर, त्यास अंकुशाचा मार’ असे साक्षात् तुकोबांनी म्हटले ते उगीच नाही.

मात्र १९९२ साली जागतिक बँकेचा दट्ट्या बसला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेने थेट १८० अंशांतून वळण घेतले. पैसा कमावणे आणि तो उधळणे, हा गुन्हा समजणे बंद झाले. पण त्यापेक्षाही म्हणजे पैसा साचवणे हे जीवनकर्तव्य मानण्यात येऊ लागले. गेल्या काही वर्षांमध्ये धट्ट्याकट्ट्या गरिबीची चेष्टा उडवून लुळ्यापांगळ्या श्रीमंतीचे गुणगान चालू होते. धनाढ्यतेचे उथळ आणि ओंगळ प्रदर्शन हाच समाजाचा ध्यास बनला होता. अगदी देवाच्या दारातही नोटांच्या किमतीवरून अग्रक्रम ठरविण्याएवढा क्षुद्रपणा आपण अंगीकारलेला. पदरी पडले आणि पवित्र झाले म्हणत आहे त्या परिस्थितीत दिवस काढणे, हेच लोकांनी आपले भागधेय मानले होते. आता ही परिस्थिती काही बदलत नाही, असाच सर्वांचा समज झाला होता.

आठ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका फटक्यात त्या समजावर घाव घातला. मराठी लोकांच्या दृष्टीने पु. ल. देशपांडे यांचा हा जन्मदिवस विनोदाच्या स्मरणरंजनात घालविण्याचा दिवस. पण पंतप्रधानांनी त्याच दिवशी एक भयानक गंमत केली आणि एका क्षणात श्रीमंत आणि गरीब एका रांगेत आले. (श्लेष झाल्यास योगायोग समजावा). गरीबीला मरण नाही, या भारतीयांच्या जुन्या समजुतीवर साचलेली राख उडून गेली आणि त्यातला अंगार पुन्हा दिसू लागला. तो अंगार कधी विझला नव्हताच, त्यामुळे त्याची परिणामकारकता हरविण्याचेही काही कारण नव्हते.

गेली तेरा दिवस नाना अडचणी सोसूनही सामान्य भारतीय नोटाबंदीच्या निर्णयावर ठाम का उभे आहे, याची संगती या घटनाक्रमात आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून तो पाठिंबा दिसून येतो आहे. लोकांना त्रास होतो आहे, तरीही लोक सरकारला शिव्या देण्यास तयार का नाहीत, याची कारणमीमांसा या मनोवृत्तीत आहे. हा निर्णय अर्थव्यवस्थेला चांगला किंवा वाईट, याच्याशी या लोकांना काही देणे-घेणे नाही. ते कळून घेण्याचीही तसदी त्यांना घ्यायची नाही. फक्त आपल्या व्यावहारिक जीवनात आपण सगळे एकाच पातळीवर आहोत, हे त्यांच्यासाठी पुरेसे आहे.

जो त्रास आपल्याला होत आहे तोच त्रास, किंबहुना त्याच्या कैकपट, गडगंज पैसा साचवून बसलेल्यांना होत आहे, ही भावनाच अनेकांना सुखावणारी आहे. कोणतेही सरकार निष्पक्ष वागताना दिसावे, ही जनतेची साधी अपेक्षा असते. काळा बाजारवाले आणि अपलक्ष्मी बाळगणारे यांनाही आपल्याच प्रमाणे त्रास होताना बघून गरीब सुखावतील, यात काय नवल? पोटासाठी या नोटा मिळविण्याकरिता गरिबांना शरीर आणि श्रम विकावे लागतात. मात्र आपली नीयत आणि आत्मासुद्धा विकून ज्यांनी या नोटा जमवून ठेवल्या त्यांची फसगत झालेली कोणाला नाही आवडणार? नोटांच्या बंडलाचे ज्यांनी घरात संग्रहालय केले होते आणि सामान्य लोकांना जे कस्पटासमान वागवत होते, ते कागदाच्या कपट्यासारखे (परत श्लेष!) भिरभिरताना पाहून गरिबांना पहिल्यांदा समाधान वाटले असेल.
काळे पैसेवाले रांगेत नाहीत, त्यांना काहीच त्रास होत नाही अशा मेसेजनी मोबाईलच्या मेमरीची परीक्षा पाहणाऱ्यांना हा मुद्दाच समजलेला नाही. कारण निर्णय आल्या-आल्या नोटाबंदीच्या पहिल्या धडाक्यातच गरिबांनी आपल्या कष्टाच्या कमाईवर प्रामाणिकतेचा शिक्का उमटवून घेतला होता. त्यानंतर जी गर्दी होती ती इतरांच्या पीठांवर रेघोट्या ओढणाऱ्यांकडून आलेली होती. संदेश पाठवणाऱ्यांना माहीत नसले, तरी गर्दीत उभे राहिलेल्यांना ते माहीत होते. तसे नसते, तर बोटाला शाई लावण्याचा फतवा निघताच बँकांबाहेरच्या भाऊगर्दीचे पानिपत होते ना!

नऊ वर्षांपूर्वी आलेल्या रजनीकांतच्या ‘शिवाजी दि बॉस’ चित्रपटात हाच विषय हाताळलेला होता. दोन नंबरवाल्यांचा काळा पैसा बाहेर काढण्याच्या मागे लागलेला नायक सर्व श्रीमंतांच्या चालक, धोबी, माळी अशा कष्टकरी नोकरवर्गाला एकत्र बोलावतो आणि त्यांच्याकडून काळ्या पैशाची ठावठिकाणे जाणून घेतो. त्यानंतर तो फिल्मी पद्धतीने त्यावर घाला घालतो, ही बाब वेगळी. पण मुद्दा हा आहे, की ज्यांचा कळवळा घेऊन लोक गरिबांनाच त्रास होतोय, बडी धेंडे सुटली वगैरे बोलत आहेत त्या लोकांना ‘आतली बात’ ठाऊक आहे. कारण बुडाखाली डबोले धरून बसलेली मंडळी आज याच लोकांच्या नाकदुऱ्या काढत आहेत. ईमानदार असणे याला पहिल्यांदाच प्रतिष्ठा मिळाली आहे, हा सरकारचा दावा खरा ठरला तो या अर्थाने! नित्यनेमाने बंगल्यांमध्ये ये-जा करणारी अशी ही सगळी सेवकमंडळी असते. तेथे बरे-वाईट काय चालले आहे, हे त्यांना बरोबर माहीत असते. त्यामुळे बंगलेवाल्यांची (आणि बंडलेवाल्यांची) पाचावर धारण बसली आहे का नाही, हे मेसेजीरावांना कळत नसले तरी रांगांवाल्यांना कळते. नोटांच्या थप्पेवाली मंडळी भलेही रांगांमध्ये लागायला आलेली नसेल, मात्र त्यांच्या गाद्या आणि लाद्या उपसू-उपसू चिंताक्रांत बसली आहेत, हे त्यांना माहीत असते.

केळीच्या सालीवरून घसरून पडलेला माणूस पहिल्यांदा आधी आपल्याला कोणी पाहिले का, हे पाहतो. आजूबाजूला कोणी पाहिले नसेल, तर त्याला हायसे वाटते. पाहिले तर लाजायला होते. येथे पंतप्रधान पदाच्या व्यक्तीने फेकलेल्या सालीवरून अख्खा जमाव घसरून पडलेला पाहिल्यावर लाज कोणाला आणि फजिती कोणाची? उलट नोटांच्या संख्येवरून अंहगंड आणि न्यूनगंड ठरण्याची प्रक्रिया काही दिवस तरी स्थगित झाल्याचीच मौज आहे.
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com