प्रिय प्रणव धनावडे,
इयत्ता दहावी,
के. सी. गांधी प्रशाला, कल्याण.
सप्रेम नमस्कार,
खरं म्हणजे तुला संबोधित करताना तुझ्या धावांचा वकुब लक्षात घेऊन ‘प्रिय प्रणव’च्या ऐवजी ‘तीर्थरूप प्रणव’ असे कोणीही लिहिल. परंतु, या पत्राच्या उद्देशाला ते छेद देणारे असल्याने तो मोह टाळतो.
सर्वप्रथम तुझ्या अचाट पराक्रमाचे मनापासून अभिनंदन. क्रिकेटमध्येच या पराक्रमाच्या तोडीचा पराक्रम कुठला असं विचारलं तर एखाद्या गोलंदाजाने सर्वच्या सर्व दहा विकेट्स कमीतकमी दहा वेळा घेऊन दाखवणे, असं ढोबळ मानाने म्हणता येईल. असे स्कोअर करायला फलंदाजाची बॅट धावांच्या रक्ताला चटावलेली लागते. डबल किंवा ट्रिपल सेंचुरी केल्यावर कंटाळा येतो. क्रिकेटमध्ये फलंदाजाला विकेट टाकायची नाही, हा मंत्र दिला जातो. तरीसुद्धा एका मर्यादेनंतर कंटाळा येणे हे मानवी लक्षण आहे. तू तो मानसिक अडथळा पार केलास आणि खेळ खेळत राहिलास, हे सगळ्यात मोठं वैशिष्टय.
क्रिकेटरला सर्वात अप्रिय गोष्टं कुठली हे विचारलं तर तो झटक्यात सांगेल, सल्ला देणारी माणसं. हजारो माणसांच्या हजारो थिअरिज असतात. त्यातले बरेचसे लोक क्रिकेट हा खेळ रणांगणासारख्या मैदानावर खेळायचा असतो कागदावर नाही, हे विसरतात आणि आपापली मतं दामटतात. हे आम्हाला माहिती आहे. असे असून सुद्धा आम्ही क्रिकेट रसिक म्हणून काही गोष्टी सांगू इच्छितो. वाचायचे का डिलीट करून टाकायचे हे तूच ठरव.
कालपर्यंत प्रणव धनावडे हे नाव तुझ्या शाळेच्या आणि राहत्या वसाहतीच्या बाहेर कुणालाही माहिती नव्हते. तुझी हजारावी धाव झाली त्या क्षणी तुझं नाव पृथ्वीच्या दक्षिण, उत्तर ध्रुवावर पोचलं आणि एका क्षणात जगभरानी तुझी चौकशी करायचा नेटवर सपाटा लावला. हा आहे प्रसिद्धीचा (किर्तीचा) वेग. प्रकाश आणि ध्वनी यांना सहज मागे टाकून वेगाची सूवर्णपदकाची शर्यत जिंकणारी हीच ती प्रसिद्धी. शाळेच्या सामन्यात चांगला स्कोअर झाल्यावर आपल्या नावाची चर्चा शाळेत झाल्यावर मस्तंच वाटतं. तुझी तर दखल बीबीसी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका जिथे जिथे क्रिकेट खेळले जाते या सगळ्यांनी घेतली. भारतात तर राजकारणी, फिल्मस्टार्स सर्वांना तू मागे टाकलेस. काय जबरदस्त फीलिंग्ज असतील तुझी याची कल्पना आम्ही करू शकतो. अवकाशाच्या टोकावरून खाली पृथ्वीकडे पाहात असल्यासारखे वाटत असेल तुला.
याच प्रसिद्धीविषयी सावध करण्यासाठी हे पत्र. तुला आगाऊपणा वाटू शकतो. पण आम्हाला सांगितल्यावर बरे वाटेल. आता निवृत्त होईपर्यंत परवलीचा एकच शब्द म्हणजे सराव सराव आणि अधिक सराव. टी.व्ही.,पत्रकार, प्रायोजक, एजेंट्स, कॉन्ट्रॅक्ट, स्तुतिपाठक यांना आदरपूर्वक सीमारेषेबाहेर ठेऊन फक्त सराव आणि सामने यावर लक्ष केंद्रित करणे. रिअॅलिटी शोज मधली अनेक अजिंक्य मुलं नंतर कुठेच दिसत नाहीत. एका स्पर्धेच्या प्रसिद्धीने ती बिचारी इतकी हुरळून जातात की सिद्धी प्राप्त करायची हे विसरूनच जातात. क्षणिक प्रसिद्धीचं भूत त्यांच्या आयुष्याला असं वळण लावतं जे नैराश्याच्या डेड एन्डला नेतं. अनेक क्रीडा प्रकारांमधले अनेक गुणी खेळाडू या प्रसिद्धीच्या भूतामुळे एकतर ‘हॉल ऑफ शेम’मध्ये गेले किंवा (अल्को)हॉल ऑफ़ फेममध्ये गेले. प्रसिद्धी ही पचवता आली नाही तर होल्डिंग, रोबर्ट्स, गार्नर, मार्शलपेक्षा खतरनाकरित्या बाद करते.
त्यामुळे सिद्धी आणि प्रसिद्धी दोन्हीला संतुलित कसे करता येते हे शिकवणारा सर्वोत्तम गुरु तुला मिळो आणि भारताला पुढची अनेक वर्षे सेवा देणारा एक आदर्श क्रिकेटपटू तुझ्या रूपाने मिळो, ही आमची प्रार्थना राहील.
आधीच लिहिल्याप्रमाणे असंख्य सल्ल्यात आमचा एक सल्ला. पण कळकळीचा हे नक्की. वानखेडेवर किंवा ईडनवर डेब्यू झाल्यास आम्ही आवर्जून येऊ. कीप बॅटिंग. ऑल द बेस्ट!!!
तुझा हितचिंतक
– रवि पत्की
sachoten@hotmail.com