News Flash

BLOG : थ्री चियर्स फॉर गहुंजे!

दोन मुलं दहावीचं एकवीस अपेक्षित घेऊन मॅचच्या पवित्र कार्यास उपस्थिती लावण्यास आली होती.

या खेळपट्टीवर उठून दिसला तो सौराष्ट्राचा उनाडकट. तिखट मारा केला त्याने. बाउंसरचे शस्त्र त्याने बाहेर काढल्यावर मुंबईचे कौशल्य पणाला लागले.

cricket-blog-ravi-patki-670x200
गहुंजेच्या स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना आहे हे समजले तेव्हाच ठरवले होते की सामना बघायला जायचे. त्यात मुंबई अंतिम सामना खेळणार म्हटल्यावर उत्साह दुप्पट झाला.
गहुंजेला शब्दश: मजल दरमजल करत पोहचावे लागते. हायवेवर चालू असलेले बांधकाम आणि आयटी पार्कची सकाळची भाऊगर्दी पार करत स्टेडियममध्ये पोहचलो. फक्त साउथ वेस्ट स्टॅंड खुला ठेवला होता. पायऱ्या चढून स्टॅंडमध्ये गेलो. दक्षिणेला आणि पश्चिमेला निवांत पहुडलेल्या आणि चैत्रपालवीच्या प्रतीक्षेत शुष्क झालेल्या पर्वत रांगानी स्वागत केले. पर्वत रांगाची पार्श्वभूमी असलेली आफ्रिका, वेस्ट इंडीज येथील सुंदर क्रिकेट मैदाने आठवली. पर्वत रांगांच्या पार्श्वभूमीवर गहुंजेचे स्टेडियम सुंदर दिसते का स्टेडियमच्या भव्य आणि कलात्मक रचनेमुळे डोंगर अधिक मनोरम दिसतो असे वाटावे इतके नेत्रदीपक स्टेडियम अजय शिर्के आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. प्रत्येक वेळेस नव्याने आ वासून हा स्थापत्य शास्त्राचा अजब दागिना मी पाहात राहतो. आत शिरताना विपुल वृक्षवल्ली, कल्पक प्रकाश योजना, उत्तम बैठक व्यवस्था, स्वच्छता, भव्य स्क्रीन्स यामुळे एका ऍम्फिथिएटरमध्ये शेक्सपिअरचा एखादा ऑपेरा पाहायला आल्याचा सुखद भास होतो.
एक छान मनाजोगती सीट शोधून जाऊन बसलो. मुंबईची फलंदाजी नुकतीच सुरु झाली होती. हेरवाडकर बाद झाला होता. श्रेयस अय्यर आणि भावेश ठक्कर खेळत होते. स्क्रीनवर देखिल मॅच दिसत असल्याने खेळपट्टीचे स्वरुप, चेंडूचा टप्पा, नजरेतून सुटलेले काही बारकावे हे सर्व रिप्लेमुळे नीट समजून घेता येते. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये सामना बघणे आणि प्रत्येक चेंडूचा रिप्ले पाहता येणे हा एकत्रित अनुभव सामना पाहाण्याचा परिपूर्ण आनंद देतो. लांब अंतरावरून अनेकदा चेंडू दिसत नाही. स्क्रीनमुळे ही कमतरता दूर झाली आणि स्टेडियमच्या वातावरणात होम थिएटरमध्ये बसून सामना पाहाण्याचा आनंद मिळणे प्रत्यक्षात उतरले.
श्रेयस अय्यर या कोवळ्या मुलाने अनेक शैलीदार कव्हर ड्राइव्स मारून दिल खुश करून टाकला. नुसता शॉट्सचा फॉलो थ्रू नेत्रसुखद असून चालत नाही. गॅप्स काढणे तितकेच महत्वाचे असते. श्रेयसकडे दोन्ही असल्याने तीन तासांत त्याने शंभर लावला. ज्या लेंथवर तो बीट होत होता त्याचा उपाय शोधण्याकरता त्याने जे प्रयत्न केले ते पाहाणे हा एक छान अनुभव होता. प्रगल्भतेतून त्याचा संयम वाढला तर उत्तम. सूर्यकुमार यादव हा ‘V’ मध्ये खेळणारा अभिजात फलंदाज आहे. (तसा तो असलाच पाहिजे. मुंबईकडून तो टू डाउन खेळतो म्हणजे…..) बॅकफुटवर खेळताना कितीही फास्ट बॉल असला तरी तो फारच आरामात खेळतो. बहोत समय है उसके पास! क्रीझवर मी खेळणार नाहीतर अजून कोण असा एक दृश्य आत्मविश्वास त्याच्या बॉडी लॅंग्वेजमध्ये आहे. काही लोकांना तो रिचर्ड्सचा तोरा वाटू शकेल. पण ‘लड़के में बात है’ हे नक्की.
गहुंजेची खेळपट्टी ग्रीन टॉप म्हणून मोहालीच्या रांगेत जाऊन बसली आहे. खेळपट्टीवरील बाउंस पाहाता एमसीजी किंवा डरबनची आठवण झाली. (अगदी लगेच वाका म्हणणार नाही) पण मुंबईच्या फलंदाजानी बाउंसवर भरवसा ठेऊन स्टंपच्या रेषेतील अनेक चेंडू सोडून दिले तेव्हा तर वाकाचा फील नक्की आला. पुण्याची खेळपट्टी अशीच ठेवण्याचा बहुतेक बीसीसीआयचा मानस दिसतोय. म्हणजे नेहरू स्टेडियमची ‘पाटा’ ते गहुंजे ची ‘वाका’ असं मोठं स्थित्यंतर स्वास्थ्यशील पुण्याने केले असं म्हणायला हवं.
या खेळपट्टीवर असलेल्या गवताने अगदी खूप नाही पण थोडी मूव्हमेंट दिवसभर मिळते असं दिसून आलं. गोलंदाजाला कायम गुंतवून ठेवणारी मस्तं खेळपट्टी आहे ही. लवकरच या खेळपट्टीवर पहिला कसोटी सामना होणार आहे. ती पर्वणी ठरणार हे नक्की.
या खेळपट्टीवर उठून दिसला तो सौराष्ट्राचा उनाडकट. तिखट मारा केला त्याने. बाउंसरचे शस्त्र त्याने बाहेर काढल्यावर मुंबईचे कौशल्य पणाला लागले. उनाडकट विरुद्ध श्रेयस आणि यादव हे द्वंद्व खिळवून ठेवणारे होते. अशा भारतातील खेळपट्टयांमुळे उसळणाऱ्या खेळपट्यांची चांगलीच सवय आपल्या फलंदाजाना होईल. अय्यर आणि यादव काही वेळेस चुकले पण डगमगले नाहीत हे महत्वाचे. सौराष्ट्राचे स्लिप कॅचिंग गोलंदाजांचा अवसानघात करणारे होते. ‘तरी म्हणत होतो पुण्यात आलात की चितळ्यांचं लोणी मॅच संपल्यावर खा’ असा एक इरसाल बाउंसर प्रेक्षकातून सौराष्ट्राच्या क्षेत्ररक्षकांवर पडला.
प्रेक्षकात मुलांबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक पण होते. दोन मुलं दहावीचं एकवीस अपेक्षित घेऊन मॅचच्या पवित्र कार्यास उपस्थिती लावण्यास आली होती. हेच ते झपाटून टाकणारे साहेबाच्या खेळाचे वेड.
मस्तं खेळ बघून बाहेर पडलो तेव्हा सामना छान बॅलन्स झाला होता.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 10:47 am

Web Title: blog by ravi patki on ranji trophy final match in gahunje stadium at pune
टॅग : Ranji Trophy
Next Stories
1 भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार
2 श्रेयसच्या शतकामुळे मुंबईला आघाडी
3 हरभजन सिंगला भारतीय क्रिकेटमध्ये सापत्न वागणूक
Just Now!
X