उन्हाळी सुटय़ा साधून सहलीला जाणारे नागरिक आणि आपापल्या गावी गेलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यामुळे शहरात रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. रक्तपेढय़ांमध्ये होणाऱ्या दोन रक्तदान शिबिरांच्या मधल्या काळात रक्तपेढय़ांना विशेषत: प्लेटलेट या रक्तघटकाचा तुटवडा जाणवू लागला आहे. अधिक संख्येने दात्यांनी रक्तपेढय़ांमध्ये जाऊन स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढय़ांनी केले आहे.
गेल्या ८ दिवसांपासून प्लेटलेटचा तुटवडा जाणवत असल्याचे सह्य़ाद्री रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘हृदयशस्त्रक्रियांचे रुग्ण किंवा लहान मुलांना रक्त देताना पाच दिवसांच्या आतले रक्त द्यावे लागते. त्यामुळे दोन रक्तदान शिबिरांमध्ये अंतर असल्यास आधीच्या शिबिरात गोळा केलेले रक्त अशा रुग्णांना देता येतेच असे नाही. प्लेटलेटचे आयुष्य पाच दिवसांचेच असल्यामुळे त्याबाबतीत नेहमी अडचण निर्माण होते. रक्ताचा कर्करोग व इतर कर्करोगांच्या रुग्णांना प्लेटलेटची प्रामुख्याने गरज भासते. लाल रक्तपेशींचा तुटवडा नसला तरी एखाद्या रक्तगटाची मागणी एकदम वाढली तरीही त्याचा तुटवडा निर्माण होतो. मेअखेपर्यंत अशी परिस्थिती राहते.’’
 केईएम रुग्णालयांच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ.आनंद चाफेकर याबाबत म्हणाले, ‘‘नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण सुटीत वाढत असल्यामुळे रक्त अधिक लागते. चार दिवसांपूर्वी आमच्या रक्तपेढीत प्लेटलेट उपलब्ध नव्हते. पण नंतर शिबिर घेण्यात आले आणि पुन्हा प्लेटलेटचा साठा झाला. दोन शिबिरांच्या मधल्या काळात प्लेटलेटची वाढीव मागणी आली, तर २-३ दिवसांसाठी प्लेटलेटचा तुटवडा राहू शकतो. त्यामुळे प्लेटलेटच्या साठय़ासाठी विशेष नियोजन करावे लागते. एप्रिल व मे महिन्यात शिबिरांचे नियोजन केले असल्यामुळे गेल्या वर्षीसारखा रक्ताचा तुटवडा यंदा जाणवणार नाही अशी आशा आहे.’’
‘रक्ताचे नाते ट्रस्ट’ चे राम बांगड म्हणाले, ‘‘गेल्या दहा दिवसांत शहरात मोठे रक्तदान शिबिर झाले नसून रक्ताची गरज वाढलेली दिसत आहे. पुढील महिन्यात नियोजित शिबिरेही कमी असल्यामुळे रक्तपेढय़ांमध्ये साठा तुलनेने कमी आहे.’’ रक्ताची गरज भासल्यास नागरिकांनी ९४२२०८५९२४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही बांगड यांनी सांगितले.
दीनानाथ रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. संजीव केतकर म्हणाले, ‘‘आमच्या रक्तपेढीत सध्या पुरेसा रक्तसाठा आहे. पण सुटय़ांच्या दिवसात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे रक्तपेढय़ांमध्ये येऊन दात्यांनी ऐच्छिक रक्तदान करण्याची गरज आहेच. विशेषत: ‘सिंगल डोनर’ प्लेटलेट दान वाढण्याची आवश्यकता आहे.’’
कॉर्पोरेट कंपन्यांच्या रक्तदान शिबिरांचा आधार!
नागरिक सुटीसाठी बाहेरगावी जात असले तरी मोठय़ा कंपन्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचा रक्तपेढय़ांना काही प्रमाणात आधार मिळतो आहे. डॉ. स्मिता जोशी म्हणाल्या, ‘‘या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे तिथे घेतल्या जाणाऱ्या शिबिरांचा मे महिन्यातील रक्तसंकलनासाठी उपयोग होणार आहे. रक्तपेढय़ांच्या गरजेनुसार या कंपन्या शिबिरांच्या तारखा बदलून देण्यासही तयार होत आहेत.’’ सह्य़ाद्री रुग्णालयाने गेल्या आठवडय़ात रक्तसंकलनासाठी मोबाईल व्हॅन देखील सुरू केली आहे, असेही त्या म्हणाल्या. रक्तदान शिबिरे नसताना रक्तदात्यांपर्यंत पोहोचता यावे असा या व्हॅनचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.