प्रचंड उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरे घटली

उन्हाळी सुट्टय़ा म्हणजे रक्तदान शिबिरांची वानवा आणि रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा असे समीकरणच मानले जाते. रक्तपिशव्यांसाठी हातातोंडाची गाठ असण्याच्या या काळात रक्तपेढय़ांना माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आधार दिला आाहे. प्रचंड उन्हामुळे रक्तदाते रक्तदानास बाहेर पडत नसताना आयटी कंपन्यांमधील रक्तदान शिबिरे फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.

केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले,‘‘उन्हाळ्यात डेंग्यू कमी असला तरी इतर रुग्णांसाठी प्लेटलेट हा रक्तघटक लागतो. परंतु सध्या रक्ताचा तुटवडा नाही. आम्ही यंदा आयटी कंपन्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे रक्तसाठा होतो. ठराविक अंतरांनी आम्ही नियमित शिबिरे घेतली. त्यामुळे प्लेटलेटस् देखील पुरेशा प्रमाणात पुरवणे शक्य झाले आणि कोणताही रक्तघटक वाया गेला नाही.’’

‘‘प्रत्येक शिबिरासाठी वातानुकूलित खोलीची सोय शक्य नसते. शिवाय बाहेर ४० अंश सेल्सिअस तापमान असताना रक्तदात्यांना चक्कर येण्याच्या भीतीने शिबिर आयोजकही सध्या शिबिरांना तयार होत नाहीत. शिबिर झाले तरी रक्तदात्यांचा आकडा कमीच असतो,’’ असे निरीक्षण सह्य़ाद्री रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांनी नोंदवले. त्या म्हणाल्या,‘‘रक्ताअभावी कोणतीही शस्त्रक्रिया थांबत नाही, परंतु रक्ताचा भरपूर साठा सध्या नाही. आमचे रुग्णालय व बाहेर अगदी अडीनडीच्या वेळी आम्ही रक्त पुरवतो, पण बाहेरुन प्रत्येक मागणी पुरवता येत नाही. एरवी महिन्याला १५ ते २० रक्तदान शिबिरे होतात. या महिन्यात आतापर्यंत मात्र केवळ ५ ते ६ शिबिरे झाली आहेत. १५ एप्रिलपासून हे चित्र आहे. आयटी कंपन्यांनी आम्हाला पुढच्या आठवडय़ात शिबिरे दिली आहेत. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या तर मोठी असतेच शिवाय जागा आणि वातानुकूलित यंत्रणा असते. दिवाळीच्या आधीही रक्तदान शिबिरे कमी असतात. त्या वेळीही आयटी कंपन्या पुढे येतात.’’