करोना विषाणूंचे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

जगभरात करोना विषाणूने मागील तीन महिन्यांपासून थैमान घातले आहे. या विषाणूचे रुग्ण आपल्या देशात देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हा आजार आटोक्यात आणण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. त्याचाच एक भाग असलेले, पोलीस प्रशासन देखील रात्रंदिवस काम करीत आहे. आता आणखी एक पाऊल पुढे येत, आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बॅच क्रमांक 2012 च्या कर्मचारी वर्गामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी हवालदार अविनाश कुमटकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज पोलिस आयुक्त कार्यालयात आमच्या बॅचकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आम्ही सहभागी झाल्याने, एक वेगळेच समाधान मिळाले आहे. आता आम्ही ज्या प्रकारे रक्तदान केले आहे. त्याप्रमाणे समाजातील प्रत्येक नागरिकाने या काळात रक्तदान करून, या करोनाच्या युद्धात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.