मंडल अधिकाऱ्याला अटक

पुणे : महसूल खात्याकडून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कारवाई न करण्यासाठी एकाकडून १५ हजारांची लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात ही कारवाई करण्यात आली.

अमोल निवृत्तीनाथ खोल्लम (वय ४०) असे लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एकाने ‘एसीबी’कडे तक्रार दिली होती. तक्रारदारा विरोधात भरारी पथकाने वाळू  चोरी प्रकरणात कारवाई केली होती. या प्रकरणात तक्रारदारा विरोधात गुन्हा दाखल करणे तसेच पुढील कारवाई न करण्यासाठी मंडल अधिकारी  खोल्लम यांनी वीस हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीत १५ हजारांची लाच देण्याचे मान्य करुन ‘एसीबी’च्या पुणे कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर गुरुवारी सापळा लावून  खोल्लम  यांना १५ हजारांची लाच घेताना पकडले.

खोल्लम  यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एसीबी’च्या पुणे कार्यालयाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.