पुण्याच्या दांडेकर पूल येथील मुठा कालव्याला भगदाड पडल्यामुळे शहराला आज पुराचे स्वरुप आले होते. कालव्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील २०० हून अधिक कुटुंबाचे संसार या पाण्यात वाहून गेल्याने येथील नागरिक बेघर झाले आहेत. या अपघातात घडलेली एक दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली आहे. मुलाच्या क्लासच्या फीसाठी बाजूला ठेवलेली रक्कम पाण्यात वाहून गेल्याने ते पालक अक्षरश: हतबल झाले आहेत. वस्तीत राहून इंजिनियर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यावर क्लासची फी कशी भरायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुठा कालवा फुटल्याने जनता वसाहत आणि पर्वती या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या पाण्यात सुरेश बोडेकर यांच्या घरातील अनेक गोष्टी वाहून गेल्या आहेत. त्यातच त्यांनी साठवलेले पैसेही वाहून गेले. मुलाच्या जेईईच्या क्लाससाठी बोडेकर यांनी ही रक्कम ठेवली होती. मार्केटयार्ड येथे हमाली करणारे सुरेश बोडेकर यांनी मित्राकडून आणलेली दीड लाख रुपयांची रक्कम वाहून गेल्याची घटना घडली आहे. क्लासच्या फीचे सगळे पैसे वाहून गेल्याने आता क्लासला प्रवेश कसा घेणार असा यक्षप्रश्न बोडेकर कुटुंबियांसमोर उभा राहीला आहे.

याविषयी मुलाची आई शेवंता बोडेकर म्हणाल्या की, आम्ही मागच्या १२ वर्षांपासून या वस्तीत राहतो. मी अनेक ठिकाणी घरकाम करते तर पती मार्केटयार्ड येथे हमाली काम करतात. मला चार मुलं असून त्यातील दोघे अपंग आहेत. मुलगा जेईईची तयारी करत होता आणि त्याच्या क्लासची फी भरण्यासाठी दीड लाख रुपये बाहेरुन आणले होते. येत्या दोन दिवसात आम्ही हे पैसे भरणार होतो. मात्र आज हे पाणी घरात शिरल्याने ही रक्कम पाण्यात वाहून गेली हे सांगताना शेवंता यांना अश्रू अनावर झाले होते. आता ही वाहून गेलेली रक्कम पुन्हा कशी उभी करायची या चिंतेत बोडेकर कुटुंबिय आहेत.