डी. वाय. पाटील संस्थेकडून खुलासा मागविला

महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात शंभरहून अधिक बोगस रुग्णांची भरती करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या घटनेची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली असता डी. वाय. पाटील संस्थेकडून बोगस रुग्णांची भरती करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या संस्थेकडे महापालिकेने खुलासा मागविला आहे.

येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात उपचारासाठी बोगस रुग्णांना दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे आणि डॅनियल लांडगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्या वेळी अनेक रुग्ण बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

उपचारांसाठी दाखल झालेल्या या रुग्णांकडे चौकशी केल्यानंतर यातील बहुतेक जण अजिंक्य डी. वाय. पाटील या संस्थेत कामाला असल्याचे त्यांना समजले. कोणताही त्रास होत नसताना केवळ महाविद्यालय प्रशासनाने सांगितल्यामुळे उपचारासाठी दाखल झाल्याची कबुलीही काही रुग्णांनी दिली, असे नगरसेविका लांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकारानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. रुग्णालयाच्या प्रशासनाने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

महापालिकेच्या रुग्णालयाचा गैरवापर अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडून करण्यात आला आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे सांगून गोरगरीब कर्मचारी आणि महापालिकेची त्यांनी दिशाभूल केली आहे. कर्मचाऱ्यांबरोबर आलेल्या डॉक्टरांकडील ओळखपत्राची आणि पदवी प्रमाणपत्राची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि रुग्णालयाचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही लांडगे यांनी केली आहे.

दरम्यान, या संदर्भात बोलताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी अंजली साबणे म्हणाल्या, महापालिकेच्या रुग्णालयामध्ये खोटे रुग्ण उपचारासाठी दाखल करण्याचे कारण काय, अशी विचारणा संबंधित संस्थेकडे करण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासाही मागविण्यात आला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर रुग्ण दाखल झाल्याची माहिती प्रशासनाला का देण्यात आली नाही, यासाठी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीसही बजाविण्यात आली आहे.

आरोप नाकारले

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संचालक आणि प्रवक्ते डॉ. राहुल गेठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना संस्थेवर करण्यात आलेले आरोप नाकारले. अजिंक्य डी. वाय पाटील विद्यापीठाने दंत रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात महापालिकेशी अधिकृत करार केला आहे. या कराराचे नूतनीकरण झाले असून त्याला स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे विनापरवाना कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. संस्थेचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर त्या रुग्णालयात असतात. मात्र बोगस किंवा खोटे रुग्ण दाखल करून घेण्यात आलेले नाहीत. मात्र या संदर्भात आरोप होत असतील, तर त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात येईल, असे डॉ. गेठे यांनी सांगितले.