रस्त्याचे काम सुरू असताना चऱ्होलीमध्ये एका पोत्यामध्ये बॉम्बसदृश चार वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस, बॉम्बशोधक-नाशक पथक आणि खडकी येथील दारूगोळा कारखान्याच्या पथकाने घटनास्थळी या वस्तूंची पाहणी केली. या यंत्रणांनी हा एक प्रकारचा दारूगोळा असल्याचे मान्य केले. मात्र, तो कधीचा आहे हा शोध घेण्यामध्ये पुरेसे यश आले नाही. मात्र, पुरातन दारूगोळ्यातील साधने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आळंदी-मरकळ रस्त्यावरून चऱ्होली गावाकडे जाण्यासाठी अमित जावळे यांच्या व्ही. एम. जावळे कन्स्ट्रक्शनमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास खोदकाम सुरू होते. दरम्यान, रस्त्यामध्ये येणाऱ्या एका झाडाजवळ पोत्यामध्ये काही तरी असल्याचे कामगारांनी पाहिले. हे पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये बॉम्बसदृश चार वस्तू असल्याचे समजले. नागरिकांनी तातडीने याबाबत आळंदी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्ब शोधक-नाशक पथकालाही पाचारण केले. हे पथक घटनास्थळी आले. मात्र, त्यांना कोणताही तर्क लावण्यामध्ये यश आले नाही. अखेर खडकी येथील दारूगोळा कारखान्यातील पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चाचपणी केली. मात्र, त्यांनाही यामध्ये निश्चित सांगता आले नाही.
पोत्यातील प्रत्येक वस्तूचे वजन सुमारे १५ किलो असून लांबी दीड फूट आहे. दारूगोळ्याशी संबंधित बॉम्बसदृश असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले असले, तरी याबाबत कोणतेच अनुमान लावता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. सध्या या वस्तू आळंदी पोलिसांकडे सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याची सखोल तपासणी झाल्यानंतरच यासंदर्भात खुलासा होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.