देशात स्मार्ट शहरांची योजना आखण्यात आली आहे आणि त्यांचे नियोजन कसे करायचे या विषयावर चर्चा झडत आहेत. या पाश्र्वभूमीवर जगभर शहरे विकसित करताना झालेल्या चुकांवर भाष्य करणारे आणि शहरांच्या आदर्श नियोजनाचा आराखडा मांडणारे ‘असावी शहरे आपुली छान’ हे पुस्तक मराठीत येत आहे. प्रसिद्ध वास्तुरचनाकार यान गेल यांच्या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद सुलक्षणा महाजन यांनी केला आहे.
जगातील निम्मी लोकसंख्या सध्या शहरांमध्ये राहते. २०५० सालापर्यंत हे प्रमाण ७५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी शहरांच्या सुनियोजित नियोजनावर फारसा भर दिला जात नाही. अशी स्थिती असताना सध्या यान गेल यांचे ‘सिटीज फॉर पीपल’ हे पुस्तक जगभर चर्चेत आहे. मूळ पुस्तक डॅनिश भाषेत असून, त्याचा जगाच्या वेगवेगळ्या भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. सर्वसमावेशक आणि शाश्वत नगर विकास हा विषय समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते. त्याद्वारे शहरांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाल्याचे अभ्यासक सांगतात. या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे मराठी भाषांतर सुलक्षणा महाजन यांनी केले आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनतर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे.
शहरांची दुर्लक्षिलेली मानवी बाजू, माणसाच्या संवेदना आणि संवादक्षेत्र, सळसळते, सुरक्षित, शाश्वत आणि आरोग्यदायी शहर, दृष्टिरेषेवरील शहर, आधी लोकजीवन, मग जमीन आणि शेवटी वास्तू.. एक सुज्ञ प्राधान्यक्रम, विकसनशील शहरे, नियोजनाची साधनपेटी अशा प्रकरणांद्वारे शहरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शहरी लोकसंख्येचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असताना अशा पुस्तकाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक काढण्यात आले आहे, असे ‘राजहंस’तर्फे सांगण्यात आले.

कॉपी टू कॉपी..
यान गेल यांचे मूळ डॅनिश भाषेत असलेल्या पुस्तकाचा जगभरात विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे या सर्व पुस्तकांची रचना एचसारखी राखण्यात आली आहे. त्याचे मुखपृष्ठ, आतील छायाचित्रे, त्यांची रचना, पुस्तकाची एकूण मांडणी या सर्वच गोष्टी एकसारख्या राखण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही भाषेतील अनुवाद घेतला तरी हे पुस्तक एकसारखेच दिसते. मूळ लेखकाने ही बाब कटाक्षाने पाळली आहे. पुस्तकाचे हक्क देताना या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच भाषांमधील पुस्तके ‘कॉपी टू कॉपी’ अशीच वाटतात, अशी माहिती राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांनी दिली.