लेखकाने हस्तलिखित दिल्यानंतर त्या लेखनाचे पुस्तक होताना सौंदर्यामध्ये भर घालण्याची जबाबदारी ही प्रकाशकाची असते. ती निभावण्यामध्ये प्रकाशक कमी पडत असेल, तर हा एक प्रकारचा सामाजिक गुन्हाच आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे ‘डिजिटल फोटोग्राफी’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ पुस्तकांच्या निर्मितीसाठी कॉन्टिेनेन्टल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांना उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा तर, बेळगाव येथील नवसाहित्य बुक स्टॉलचे संचालक विनायक जवळकर आणि एकनाथ जवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सासणे बोलत होते. कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे, संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह अविनाश पंडित आणि नितीन गोगटे या वेळी उपस्थित होते.
सासणे म्हणाले, प्रकाशन विश्वात तंत्रज्ञानाने झपाटय़ाने प्रगती केलेली असताना अधिकाधिक उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे ध्येय प्रकाशकाने ठेवले पाहिजे. मराठी प्रकाशकांनी आपल्या कामाची कक्षा रुंदावत अन्य भाषांतील पुस्तकांची निर्मिती करावी. अनुवादित साहित्याला दुय्यम न मानता अन्य परकीय भाषांतील अभिजात साहित्य मराठीमध्ये आणण्यासंदर्भात विचारमंथन केले पाहिजे. पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील सर्व घटकांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.
प्रकाशकांनी त्यांच्या व्यवसायाचे गणित समजावून सांगितल्यास कॉसमॉस बँक प्रकाशकांना नक्की अर्थसाहाय्य करेल, असे विक्रांत पोंक्षे यांनी सांगितले. राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश पंडित यांनी सूत्रसंचालन केले. नितीन गोगटे यांनी आभार मानले.