13 December 2017

News Flash

विद्येच्या माहेरघरापासून ग्रंथप्रदर्शने चार हात लांबच

वाङ्मयीनदृष्टय़ा समृद्ध अशी सांस्कृतिक पुण्याची ओळख आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 20, 2017 4:28 AM

खर्चाच्या तुलनेत विक्री होत नसल्याने प्रदर्शनांना कात्री

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यापासून ग्रंथप्रदर्शने चार हात लांबच गेली आहेत. प्रदर्शनासाठी खर्चामध्ये सातत्याने वाढ होत असताना त्या तुलनेत विक्रीतून मिळणारी रक्कम तुटपुंजी ठरत असल्याने ग्रंथप्रदर्शन भरविणे हा आतबट्टय़ाचा व्यवहार झाला आहे. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका पुस्तक खरेदीला बसला असून त्यातून अजून सावरणे शक्य नसल्याने ग्रंथविक्रेत्यांनी प्रदर्शनांना कात्री लावली आहे.

वाङ्मयीनदृष्टय़ा समृद्ध अशी सांस्कृतिक पुण्याची ओळख आहे. विविध प्रकाशकांची आणि वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची पुस्तके एका छताखाली उपलब्ध करून देणारे माध्यम म्हणून ग्रंथप्रदर्शनांकडे पाहिले जाते. वाचनाची आवड असलेले नागरिक आवर्जून ग्रंथप्रदर्शनाला भेट देतात आणि आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करतात हा अनुभव बहुतांश ग्रंथविक्रेत्यांना येत असतो. आचार्य अत्रे सभागृह येथे खास वेळ काढून पुस्तक खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या वाचनप्रेमींच्या संख्येमुळे हे सभागृह ग्रंथप्रदर्शनांचे माहेरच समजले जाते. कित्येक घरांमध्ये मासिक उत्पन्नातील काही रक्कम ही पुस्तक खरेदीसाठी राखून ठेवली जाते. त्यातूनच ‘पुस्तक भिशी’सारख्या अभिनव उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद लाभला. मात्र, प्रदर्शनासाठीच्या खर्चामध्ये सातत्याने वाढ होत असून त्या तुलनेत विक्रीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तुटपुंजी ठरताना दिसून येत आहे. दिवाळीनंतरच्या काळात नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून पुस्तक विक्रीला फटका बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाढते खर्च आणि तुटपुंजे उत्पन्न याचा ताळमेळ जुळत नसल्याने आम्ही दिवाळीनंतर ग्रंथप्रदर्शन भरविलेलेच नाही, असे ‘अक्षरधारा बुक गॅलरी’चे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. प्रदर्शनासाठीच्या सभागृहाचे आणि पुस्तके मांडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टेबल-खुच्र्याचे दररोजचे भाडे, खास प्रदर्शनासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, प्रदर्शनासाठी फ्लेक्स, बॅनर या माध्यमांसह वृत्तपत्रांतील जाहिरात आणि पुस्तकांच्या देखरेखीसाठी रात्रपाळीला सुरक्षारक्षक नेमला, तर त्याचे दिवसाचे मानधन अशी प्रदर्शनासाठीच्या खर्चाची बाजू आहे.

इतका खर्च केल्यानंतर पुस्तकांची विक्री होईल याची कोणतीही शाश्वती उरलेली नाही. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर तर खरेदीची इच्छा असूनही लोकांकडे पैसे नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून ग्रंथविक्रेते अद्याप सावरलेले नाहीत. कदाचित दिवाळीनंतर हे चित्र पालटू शकेल, अशी आशा वाटते, असेही राठिवडेकर यांनी सांगितले.

ग्रंथप्रदर्शनाचे खर्च वाढले असून पुस्तकांच्या विक्रीतून तेवढे उत्पन्न होत नाही हे वास्तव आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका ग्रंथप्रदर्शनांना बसला आहे. आता ई-बुक वाचनाकडे कल वाढला असून घरबसल्या ऑनलाइन खरेदीचा मार्ग वाचकांनी स्वीकारला आहे. त्याची झळ पुस्तकाच्या दुकानांसह ग्रंथप्रदर्शनात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसली आहे, असे ‘साहित्य दरबार’चे विनायक धारणे यांनी सांगितले.

ग्रंथविक्रेत्यांचे खर्च वाढले असून त्या तुलनेमध्ये पुस्तकांची विक्री होत नसल्याने आचार्य अत्रे सभागृहामध्ये या वर्षी ग्रंथप्रदर्शने भरलेली नाहीत. त्यात त्यांना नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे, असे आचार्य अत्रे सभागृहाचे अप्पा परचुरे यांनी सांगितले. खरे तर सभागृहाचे आरक्षण केले जात असताना आम्ही पुस्तक विक्रेत्यांना प्राधान्य देत असतो. पण, सध्या कोणत्याच पुस्तक विक्रेत्यांनी मागणी केली नसल्याने हे आरक्षण अन्य व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, असेही परचुरे यांनी सांगितले.

ग्रंथप्रदर्शनासाठी होणारा खर्च

  • सभागृहाचे भाडे – ५ हजार रुपये (दररोज)
  • मंडप भाडे – ५०० रुपये (दररोज)
  • बॉक्स कमान – ५०० रुपये (दररोज)
  • टेबल-खुच्र्या भाडे, वीज बिल आणि जाहिरात
  • महापालिकेच्या विविध परवानगीसाठी आकाशचिन्ह विभागाचे भाडे

First Published on July 20, 2017 4:28 am

Web Title: book exhibitions pune