फेसबुक या आधुनिक माध्यमाद्वारे जुळलेल्या मैत्रीतून सृजनात्मक आविष्कार घडला आहे. मूळचे पुण्यातील आणि सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास असलेले लेखक आणि प्रकाशिका पुण्याची. फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्यात मैत्र जुळले आणि रस्त्यावरील फेरीवाला ते पब्लिसिटी डिझायनर असा साठ वर्षांचा श्रीकांत धोंगडे यांचा प्रवास ‘साठवणीतील आठवणी’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध झाला.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे श्रीकांत धोंगडे यांच्या ‘साठवणीतील आठवणी’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (८ जून) चित्रपट कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव पार केलेले प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास निर्मात्या कांचन अधिकारी आणि कवी संदीप खरे उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी श्रीकांत धोंगडे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे. बालगंधर्व कलादालन येथे १० जूनपर्यंत दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
यशोशिखर गाठलेली प्रत्येक व्यक्ती ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली नसते, तर आयुष्यातले अनेक चढउतार पचवत आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर तिने आपले जगणे समृद्ध केलेले असते. श्रीकांत धोंगडे यांचा असाच चित्तथरारक आणि प्रेरणादायी जीवनप्रवास वाचकांसमोर यावा या उद्देशातून त्यांना लिहिते केले असल्याची माहिती प्रकाशिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी दिली.
नेहरू चौकात रस्त्यावरील फेरीवाला म्हणून वयाच्या दहाव्या वर्षी कामास केलेली सुरुवात.. बाबू गेनू चौकात रिबिन, कंगवे-फणी विक्री करून दिवसाला दोन रुपये घरी नेल्याशिवाय न पेटणारी चूल.. रविवार पेठेतील अमोलिक होजियरी सप्लायर या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून केलेली उमेदवारी आणि त्यांच्या ‘हमराही’ या बनियानसाठी केलेली बोधचिन्हाची (लोगो) निर्मिती.. हा प्रवास श्रीकांत धोंगडे यांनी जणू कालपरवा घडला असा सांगितला.
‘‘हरिश्चंद्र लचके यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटगृहात दाखविण्यासाठी केलेल्या स्लाइड्स पाहून अनंत माने यांच्या ‘केला इशारा जाता जाता’ चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवासाठी पब्लिसिटी करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. तेथून मग मागे वळून पाहिलेच नाही. धोंगडे यांनी आतापर्यंत ३०० मराठी चित्रपटांसह विविध प्रादेशिक भाषांतील दीड हजारांहून अधिक चित्रपटांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीचे काम केले आहे. ताराचंद बडजात्या यांच्या राजश्री फिल्म्ससाठी १९७४ पासून चार दशके ते काम करीत असून नव्याने प्रसिद्ध होत असलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी काम केले आहे. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, चित्रपती व्ही. शांताराम, अनंत माने, राजा परांजपे, राजा बारगीर यांच्यापासून ते ग्रेट शोमन सुभाष घई आणि सचिन अशा विविध चित्रकर्मीबरोबर केलेल्या कामातून खूप काही शिकायला मिळाले,’’ असे धोंगडे यांनी सांगितले.