गेल्या वर्षीपासून गाजणाऱ्या राज्य मंडळाच्या पाठय़पुस्तकांतील चुकांची दुरूस्ती राज्य मंडळाने अखेर केली असून नववी ते बारावीच्या पुस्तकांमधील चुकांबाबत मंडळाने शाळांना शुद्धीपत्रक पाठवले आहे.
नववी ते बारावीच्या पाठय़पुस्तकांतील चुकांनी गेले वर्ष गाजवले. पुस्तके अधिप्रमाणित करताना पुस्तकांत खंडीभर चुका झाल्याची कबुलीच राज्यमंडळाने दिली आहे. अखेर आता या चुकांबाबत शुद्धीपत्रक काढून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना चुकांची कल्पना देण्यात यावी, असे पत्र राज्य मंडळाने शाळांना दिले आहे. व्याकरण, वाक्यरचना, संकल्पना, नकाशातील चुका, नावातील चुका असे चुकांचे प्रदर्शनच या पुस्तकांमध्ये राज्यमंडळाने भरवले आहे.
नववीच्या भूगोलाच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकांत ४५, इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात १४ चुका झाल्या आहेत. दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या भूगोलाच्या पुस्तकात तब्बल ८४ चुका आहेत, तर मराठी माध्यमाच्या पुस्तकात ३३ चुका आहेत. नववीच्या मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकांत ६४ आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांत तब्बल ७३ चुका आहेत. अकरावीच्या अर्थशास्त्राच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकांत १४ आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात १२ चुका आहेत. तर्कशास्त्र विषयाच्या अकरावीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या पुस्तकांत ६, तर बारावीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात ८ आणि मराठी माध्यमाच्या पुस्तकांत ६ चुका आहेत. राज्य मंडळाने शुद्धीपत्रक पाठवले असले, तरीही अद्यापही नववी आणि दहावीच्या इतिहास, भूगोल विषयांच्या पुस्तकांमध्ये व्याकरणाच्या आणि तपशिलाच्या चुका असल्याची तक्रार शिक्षक करत आहेत. विशेषत: इतिहासाबरोबर असणाऱ्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये काही तपशिलांमध्ये चुका असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.