दिलीपराज प्रकाशनचे उद्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण

पुणे : करोना उपचार घेत असलेल्या रुग्णांना रंजनाबरोबरच मानसिक बळ मिळण्याच्या उद्देशातून वाचनासाठी एक लाख रुपयांची पुस्तके भेट देऊन दिलीपराज प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांला शनिवारी (३ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. करोना रुग्णांसाठी भेट देण्यात येणारी पुस्तके एका छोटेखानी कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

बालसाहित्य, कथा, कादंबरीसह विविध विषयांवरील पुस्तकांचे भांडार वाचकांसाठी खुले करणाऱ्या दिलीपराज प्रकाशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांला शनिवारपासून सुरुवात होत आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, करोना संकटामुळे आता छोटेखानी कार्यक्रमाद्वारे एक लाख रुपयांची पुस्तके भेट देऊन सुवर्णमहोत्सवी पदार्पण साजरे करण्यात येणार आहे, अशी माहिती दिलीपराज प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बर्वे यांनी दिली.

कोल्हापूर येथे ३ ऑक्टोबर १९७१ रोजी ‘छान छान नाटुकली’ या डॉ. अश्विनी धोंगडेलिखित बालसाहित्याच्या पुस्तकाने दिलीपराज प्रकाशनची स्थापना झाली. नोकरीचा राजीनामा देऊन बर्वे पुण्यामध्ये वास्तव्यास आल्यानंतर प्रकाशन व्यवसायही पुण्यामध्ये आला. प्रभाकर पाध्ये आणि डॉ. रमेश धोंगडेलिखित ‘तेंडुलकरांची नाटके : पाठय़ आणि प्रयोग’ या समीक्षा गं्रथाच्या प्रकाशनाने प्रौढ वाङ्मय क्षेत्रात दिलीपराजने पाऊल टाकले. गेल्या ४९ वर्षांत प्रकाशनाने अडीच हजारांहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. डॉ. अश्विनी धोंगडे यांचे ‘पाषाणपुरुष’, सुहास शिरवळकर यांचे ‘कोवळीक’ आणि बाबा कदम यांचे ‘पिकनिक’ या पुस्तकांद्वारे कथा-कादंबऱ्या प्रकाशनाची वाटचाल सुरू झाली. ‘मराठी मौलिक चित्रगीते’ या गंगाधर महांबरे यांच्या पुस्तकाच्यानिमित्ताने दिलीपराज प्रकाशनचा २००२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सुवर्णकमळ देऊन सन्मान करण्यात आला होता. सुहास शिरवळकर, बाबा कदम, अनंत तिबिले, चिंतामणी लागू, डॉ. शरणकुमार लिंबाळे, बाळ गाडगीळ, रमेश मंत्री या लेखकांची सर्व पुस्तके दिलीपराजने प्रकाशित केली आहेत, असे बर्वे यांनी सांगितले.

‘शो मस्ट गो ऑन’

उद्योगपती रावबहादूर बा. म. गोगटे यांचे ‘सागरमेघ’ हे चरित्र वडिलांनी (प्रा. द. के. बर्वे) लिहिले होते. पुस्तकाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर डिसेंबर १९८१ मध्ये वडिलांचे निधन झाले. मात्र, ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हणत हे दु:ख बाजूला ठेवून ६ जानेवारी १९८२ रोजी मुंबई येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ उद्योगपती शंतनूराव किलरेस्कर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते, अशी आठवण राजीव बर्वे यांनी सांगितली.