किरण पुरंदरे, पक्षितज्ज्ञ

झाडावरून जमिनीवर फळ पडले की त्याचा जोरात आवाज यायचा. शाळेतील तास कधी संपतोय आणि ते फळ घ्यायला जातोय, याची वाट मी बघायचो. वर्गातील खिडकीतून झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलकिलाट मला स्वस्थ बसू देत नव्हता. दहावीमध्ये इरावती कर्वे यांच्या ‘भ्रमंती’ आणि वि. द. घाटे यांच्या ‘कॅशिया भरारला’ या धडय़ातील वर्णन वाचून मला पक्ष्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले. झाडांसोबतच पक्षी, प्राणी आणि वनस्पतींशी घट्ट मत्री झाली ती पाठय़पुस्तकातील निसर्गाच्या या वर्णनांमुळे. लहानपणी चतुर नावाचा पक्षी पकडायची फार हौस. त्यामुळे तेव्हापासूनच पक्ष्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आणि त्याचा शोध घेण्यासाठी जंगलाप्रमाणे मी पुस्तकांकडेही वळलो.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

घरी चांदोबा, किशोर, अमृत असे वेगवेगळे अंक येत असत. त्यामध्येदेखील आधी अनुक्रमणिका पाहायची आणि निसर्गाशी निगडित असलेले लेख वाचनाचा छंद सुरू झाला. महाविद्यालयामध्ये असताना व्यंकटेश माडगूळकरांचे ‘नागझिरा’ हे पुस्तक हातात पडले. निसर्गाच्या जवळ नेणारे हे माझे पहिले विकत घेतलेले पुस्तक. त्यासोबतच उष:प्रभा पागे यांचा निसर्गाशी संबंधित लेखही वाचनात आला. त्यामुळे मी निसर्गाविषयी आणि प्राणी-पक्ष्यांविषयी अधिकच उत्सुकतेने विचार करू लागलो. माडगूळकरांची शब्दांची अचूक निवड आणि शास्त्रशुद्ध विवेचन यामुळे ती पुस्तके वाचण्यात जास्त आनंद मिळत असे. माडगूळकरांसोबतच प्रकाश गोळे, मारुती चित्तमपल्ली, बी. एस. कुलकर्णी यांच्या पुस्तक वाचनातून मी निसर्गाचे सौंदर्य अनुभवले.

प्रकाश गोळे यांची ‘एका तळय़ात होती’, ‘चक्रवाक् देशी’, ‘निसर्गयात्रा’, ‘अशी तळे असे पक्षी’ ही पुस्तके माझ्या आवडीची. त्यामुळे आपल्यालाही निसर्गाशी घट्ट मत्री करून असे काम करता येईल का, असे वाटू लागले. कोणतेही पुस्तक, लेख किंवा साहित्य वाचले, तरी त्या व्यक्तीवर वाचनाचे संस्कार होत असतात. गो. नी. दांडेकर यांच्या ‘माचीवरचा बुधा’, ‘जैत रे जैत’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकांचे परिच्छेद मला आजही तोंडपाठ आहेत. अल्पाक्षरी भाषा म्हणजेच कमी शब्दांत नेमके पुस्तकांतून मांडले जात असल्याने वाचनाची गोडी हळूहळू वाढू लागली होती. माडगूळकरांची ‘सत्तांतर’, ‘बनगरवाडी’, ‘करुणाष्टक’ ही पुस्तके माझ्या वाचनात आली. महविद्यालयामध्ये असताना आमचा जिप्सी हा ग्रुप होता. मुक्ता अवचट यांच्यापासून अनेक मंडळी त्यामध्ये होती. मनसोक्त भटकायचे आणि त्यासंबंधी वाचन करायचे, असा आमचा त्या काळी दिनक्रम असायचा. लेखकाच्या वाटेवरून प्रवास करीत निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आम्ही करीत होतो.

आपल्या अवतीभोवती शेकडो प्रकारचे पक्षी, प्राणी, वनस्पती आहेत. त्यांचे नेमके नाव, माहिती मिळवायची हे मी मनाशी पक्के केले. त्यासाठी संदर्भग्रंथ तर लागणारच. त्यामुळे सुरुवातीला जेम्स थॉमस मोल्सवर्थ या इंग्रजी लेखकाने तयार केलेली मराठी-इंग्रजी डिक्शनरी मिळविली. त्यामधून निसर्गाचे वेगवेगळे शब्द गोळा करायचा छंद सुरू झाला. वेगवेगळय़ा पक्ष्यांची नावे शोधायची, त्याचे इंग्रजीमधील नाव आणि शक्य झाल्यास वैशिष्टय़ ही माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामध्ये मला मोठी मदत झाली, ती ऑक्सफर्ड डिक्शनरीची. डॉ. सलीम अली यांच्या ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ या पुस्तकाने मला साथ दिली. प्रत्येक पक्षिमित्र, संशोधक आणि अभ्यासकाच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक.

पुस्तकांच्या दुकानात गेल्यानंतर मी कधीही लेखकाचे नाव किंवा पुस्तकाचा ढाचा पाहिला नाही. निसर्गाशी संबंधित पुस्तक आपल्या बुकशेल्फमध्ये असावे, ही माझी इच्छा असायची. वाढदिवसाला मित्र मला पुस्तक भेट देतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून जवळ महंमद अली रस्त्यावर असलेल्या बुक डेपोमध्ये मी आवर्जून पक्ष्यांवरील पुस्तकांच्या खरेदीसाठी जात असे. तेव्हा अनेकदा रेल्वेस्थानकाबाहेर फुटपाथवरदेखील फुलपाखरे, कीटक, अभयारण्ये अशा वेगवेगळय़ा विषयांवरील पुस्तके मला मिळाली आणि त्यांचा संग्रह मी करत गेलो. मिलिंदकुमार खैरे आणि प्रदीप कृष्णन यांची वनस्पतींवरील पुस्तके मी आवर्जून वाचत असे. कोळी या प्राण्यावर काही पुस्तके आहेत का, याची उत्सुकता मला नेहमी होती. त्यामुळे त्याविषयीची जेवढी पुस्तके मिळाली, त्यातून आणि इतरही माहितीद्वारे मी टाचण काढण्यास सुरुवात केली. काही काळानंतर तेच माझ्यासाठी संदर्भपुस्तिका म्हणून उपयोगी पडले. वाचनाचा फायदा किती होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण.

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र, तर कधी देशभरात विविध ठिकाणी निसर्गात भटकंतीकरिता मी जातो. विविध ठिकाणी मिळणारी निसर्गविषयक पुस्तके आणि संदर्भग्रंथ आपल्या संग्रही असावे, असा प्रयत्न करतो. डेहराडून येथील नटराज बुक डेपो हे आम्हा निसर्गवेडय़ांचे हक्काचे ठिकाण. तेथे केवळ भारतातीलच नाही, तर आशिया खंडातील निसर्गाविषयीची नवनवीन पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे तेथून आणलेल्या अनेक पुस्तकांचा संग्रह मी जपून ठेवला आहे. सुरेश आणि उषा अत्रे हे दाम्पत्य २००३ मध्ये रणथंबोर येथील सहलीला आले होते. सहलीनंतर त्यांनी मला अमेरिकेवरून ‘नॉर्थ अमेरिकन बर्ड्स’ नावाचे पुस्तके पाठविले. भारत आणि अमेरिका येथील निसर्गात आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये काही साधम्र्य आहे का, याचा अभ्यास मला त्यामुळे करता आला. तर न्यूझीलंडमधील मनीष पुरंदरे या माझ्या नातेवाइकाने मला पुस्तक पाठविले होते. त्या न्यूझीलंडमधील लेखकाला मी माझे पुस्तक भेट म्हणून पाठविले होते. पुस्तक आणि वाचनप्रेमाला कोणत्याही देशाच्या सीमा नसतात. त्यामुळे सर्वदूर पसरलेले माहितीचे दालन आपण कशाप्रकारे हाताळतो, हे महत्त्वाचे असते.

वाचनासोबतच मला लेखनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे ‘सखा नागझिरा’ ही निसर्गावरील पुस्तके मी लिहू शकलो. निसर्गाशी संबंधित पुस्तके लिहिताना माहिती अचूक असणे गरजेचे असते. या पुस्तकाच्या वेळी नागपूर विद्यापीठातील पुस्तकांच्या वाचनाप्रमाणे इतर ठिकाणी संदर्भग्रंथ मी हाताळले. त्याला मी माहितीची शिकार असे म्हणतो. माझ्या बुकशेल्फमधील पुस्तकांचा उपयोग इतरांनाही व्हावा, ही इच्छा अनेक दिवसांपासून मनात होती. त्यामुळे भंडारा येथील लाखनी तालुक्यात तेथील ग्रामस्थांकरिता पाचशेहून अधिक पुस्तके मी भेट म्हणून दिली. माझा रानातला ग्रंथसंग्रह तेथील लोकांच्या उपयोगी पडावा, याकरिता अशोक गायधने हे माझे सहकारी आज प्रयत्नशील आहेत. तर, पुण्यातील अक्षरनंदन शाळेला निसर्गाशी संबंधित असलेला पुस्तकांचा खजिना मी भेट दिला आहे.

ब्रिटिशांनी त्या वेळी नोंदविलेले निष्कर्ष आजही गॅझेटियर्समध्ये उपलब्ध आहेत. त्याला ‘जिल्हा स्थलवर्णन कोश’ असे आपण म्हणतो. त्यातील अनेक संदर्भ आणि आजची परिस्थिती याचा अभ्यास करताना विविध नावीन्यपूर्ण गोष्टी समोर येतात. निसर्गातील हे रंग जगभरात पोहोचावेत, याकरिता विकिपीडिया इंटरनेटच्या माध्यमातून मदत देतो. परंतु माझाही त्यामध्ये खारीचा वाटा असावा म्हणून पक्षी, प्राणी आणि निसर्गावर आधारित लेख आणि माहिती मी विकिपीडियाला पाठविणार आहे. पुस्तकांच्या जगात इंटरनेटवरील माहितीचा उपयोग तरुणाईला व्हावा आणि कळत नकळत त्यांनीही इंटरनेटवरून पुस्तकांशी मत्री करावी, यासाठी माझा हा प्रयत्न!