राज्य शासनाच्या अत्यावश्यक सेवेमध्ये पुस्तकांचा समावेश नसल्याने पुस्तकांची दुकाने बंद आहेत. तर, दुसरीकडे ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना कुरिअर सेवा बंद असल्यामुळे पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे. ग्रंथालयांना टाळेबंदी असल्याने शुक्रवारी (२३ एप्रिल) सलग दुसऱ्या वर्षी जागतिक पुस्तक दिन वाचनप्रेमींना पुस्तकांविनाच साजरा करावा लागणार आहे.

नाटककार शेक्सपिअर यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. माणसाच्या मनाला आधार देत जगण्यासाठी उभारी मिळावी ही अपेक्षा असताना करोना प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर नव्या पुस्तकांच्या खरेदीसाठी पुस्तकांची दुकाने बंद आहेत. तर, गर्दी टाळण्याच्या उद्देशातून शहरातील ग्रंथालये बंद ठेवण्यात आली आहेत.

शासनाच्या अत्यावश्यक सेवांच्या सूचीमध्ये पुस्तकांचा समावेश नसल्यामुळे पुस्तकांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे जागतिक पुस्तक दिन असतानाही दुकाने बंदच राहणार आहेत, असे मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनी सांगितले. ऑनलाइन विक्री सुरू असली तरी कुरिअर सेवा बंद असल्यामुळे वाचकांना पुस्तके मिळण्यास उशीर लागत आहे. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचकांसाठी सवलतीच्या दरामध्ये पुस्तकांची विक्री केली जाते. एकदा वाचक दालनामध्ये आल्यानंतर एखादे पुस्तक तरी खरेदी करतात, असा आमचा अनुभव आहे, असे कोठावळे यांनी सांगितले.

कडक निर्बंधांमुळे सध्या अक्षरधारा बुक गॅलरी बंद ठेवण्यात आली आहे, असे अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. नागरिक ऑनलाइन पुस्तके घेत आहेत. पण, कुरिअर सेवा बंद असल्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुस्तके मिळण्यास विलंब लागत आहे, अशी परिस्थिती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार पुस्तकांची दुकाने आणि ग्रंथालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये जागतिक पुस्तक दिनाचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. परिषदेतर्फे दरवर्षी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकांची विक्री करणारे विक्रेते, पुस्तकांची मुखपृष्ठे चितारणारे चित्रकार आणि मुद्रितशोधक अशा वेगवेगळ्या घटकांचा सलग तीन वर्षे सत्कार करण्यात आला होता. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी पुस्तके आणि वाचकांविना जागतिक पुस्तक दिन साजरा करावा लागत आहे याची खंत वाटते, असे जोशी यांनी सांगितले.

पुस्तकांचे पूजन

शासनाच्या आदेशानुसार पुणे नगर वाचन मंदिर वाचकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ग्रंथ देव-घेव व्यवहारसुद्धा बंद आहेत. त्यामुळे जागतिक पुस्तक दिनानिमित्त शुक्रवारी कोणताही कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. आम्ही मोजके चार-पाच पदाधिकारी सकाळी साडेदहा वाजता पुस्तकांचे पूजन करणार आहोत, असे पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी सांगितले.

अत्यावश्यक नाही म्हणून…

राज्य शासनाच्या अत्यावश्यक सेवा या सूचीमध्ये पुस्तकांचा समावेश नसल्यामुळे राज्यातील सर्वच ग्रंथप्रेमींकडून सलग दुसऱ्या वर्षी पुस्तकांविना जागतिक पुस्तक दिन साजरा होणार आहे.

समाजाच्या सर्व घटकांबद्दल बोलले जाते, पण पुस्तकांविषयी कोणीच बोलत नाही. माणसांना उभारी देण्याचे काम पुस्तके करतात. पण, पुस्तके ही अत्यावश्यक गोष्ट नसल्यामुळे सकाळी सात ते अकरा या वेळात पुस्तकांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

– रमेश राठिवडेकर, अक्षरधारा