सॉफ्टवेअर व्यवसायातील विविध आव्हाने, नव्या गरजा, बाजारपेठ अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी इंडियन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स इंडस्ट्री राउंडटेबल (आयस्पिरीट) तर्फे पुण्यात दोन दिवसीय शिबिराचे (बूट कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयस्पिरीटचे एक संस्थापक आणि क्विक हीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास काटकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
आयस्पिरीटतर्फे आयोजित करण्यात आलेले हे शिबिर ४ आणि ५ डिसेंबरला होणार आहे. सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रामध्ये नव्याने आलेल्या किंवा येऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी ग्राहकांचा शोध कसा घ्यावा, ग्राहकांच्या गरजा कशा ओळखाव्यात याबाबत या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सॉफ्टवेअर निर्मिती उद्योगात स्थिरावलेल्या मात्र, व्यवसायाचे विस्तारीकरण करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठीही मार्गदर्शन करणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराबाबत काटकर यांनी सांगितले, ‘‘भारतामध्ये अशाप्रकारचे शिबिर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काही करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल.’’