बोपखेलचा मूळ रहदारीचा रस्ता बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी मार्गासाठी सुरू असलेला रहिवाशांचा संघर्ष आता संपणार असून बोपखेल ते खडकी ‘५१२’ जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गातील सर्व अडथळे जवळपास दूर झाले आहेत. गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी निवडक लष्करी व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली, त्यात उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावण्यात आल्याने महापालिकेच्या वतीने या कामाच्या लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत.
संरक्षणमंत्री पर्रिकर गुरुवारी काही कार्यक्रमांसाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी पुणे व बोपखेलच्या प्रश्नांसाठी बैठक घेतली. पुण्याच्या प्रश्नांसाठी महापालिका आयुक्त कुणालकुमार उपस्थित होते. तर, बोपखेलच्या विषयासाठी पिंपरीचे आयुक्त राजीव जाधव, सहशहर अभियंता राजन पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत बोपखेलच्या उड्डाणपुलासाठी तातडीने ‘ना हरकत पत्र’ देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, उड्डाणपुलासाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी, उड्डाणपुलाच्या कामाचा खर्च १७ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र, आता पाटबंधारे विभागाकडूनही पुलासाठी ‘ना हरकत’ पत्र घ्यावे लागणार आहे. त्यामुळे कामात काही बदल होतील व खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत पर्रिकर यांनी बोपखेलच्या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेतला होता. बोपखेल ते खडकीला जोडणारा पूल तसेच जोडरस्त्यास मान्यता देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे व त्यासाठी लागणारे ‘ना हरकत पत्र’ देण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. पिंपळे सौदागरचा विषय बैठकीच्या विषयपत्रिकेवर नसतानाही त्याची माहिती घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या बैठकीनंतर लष्कराकडून बोपखेलच्या पुलासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यावर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर, तात्पुरता तरंगता पूल आहे, त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीपासून राजकीय नेते दूरच ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, मर्यादित अधिकाऱ्यांनाच बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. बैठकीच्या ठिकाणी मोबाईल दूरध्वनी जवळ बाळगण्यास अटकाव करण्यात आला होता.