बोपखेल ग्रामस्थ आणि लष्कर यांच्यात वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या संघर्षांचा गुरूवारी रस्त्याच्या कारणावरून उद्रेक झाला. लष्कराने बंद केलेला रस्ता सुरू करण्यासाठी ग्रामस्थांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून पोलिसांच्या गाडय़ा फोडण्यात आल्या. पोलिसांनीही आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेत अनेक नागरिक तसेच पोलीसही जखमी झाले. आंदोलकांची उशिरापर्यंत धरपकड सुरू होती. या घटनेमुळे दुपारनंतर संचारबंदी लागू केलेल्या बोपखेलमध्ये दिवसभर तणाव होता.
बोपखेल ग्रामस्थ आणि लष्करात21bopkhel2 गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, त्याचे वेळोवेळी तीव्र पडसादही उमटले आहेत. लष्करी हद्दीतून जाणारा दापोडी ते बोपखेल हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणावरून बंद करण्याचा निर्णय लष्कराने घेतला, त्यास ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. वर्षांनुवर्षे रहदारीचा असलेला हा रस्ता बंद करून जवळपास १५ किलोमीटर वळसा पडणारा पर्यायी रस्ता वापरण्याची सक्ती ग्रामस्थांना होऊ लागली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप होता. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र आठ दिवसांपूर्वी गावक ऱ्यांच्या विरोधात निकाल लागला. त्यानंतर लष्कराने तातडीने रस्ता बंद केला. त्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊ लागली. या विषयावरून गावात तीव्र असंतोष खदखदत होता. दोनच दिवसापूर्वी, खासदार अमर साबळे यांनी बोपखेलच्या विषयावर तोडगा काढण्याची मागणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. यासंदर्भातील माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू, अशी ग्वाही पर्रिकरांनी दिली होती. या पाश्र्वभूमीवर गुरूवारी सकाळी लष्कराने बंद केलेला रस्ता सुरू करण्याच्या हेतूने ग्रामस्थ एकत्र आले. ते लष्कराच्या गेटवर चालून येऊ लागले, तेव्हा पोलिसांनी जमावाला अटकाव केला. ग्रामस्थांनी पोलिसांना जुमानले नाही. वाद वाढला तसे ग्रामस्थ आक्रमक झाले. पोलिसांच्या गाडय़ा फोडण्यात आल्या, पोलीस कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नागरिकांवर दगड फेकले व नंतर लाठीमारही सुरू केला. अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्या. तरीही ग्रामस्थ मागे हटत नव्हते, त्यांच्याकडून दगडफेक सुरूच राहिल्याने पोलिसांनी आक्रमक पावित्रा घेतला. ते घराघरात घुसून आंदोलकांना ओढून बाहेर काढू लागले. लहान मुले, महिला व वृध्द नागरिकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. काही बघे व पत्रकारांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. चहुबाजूने पोलिसांवर दगड पडत होते. जागोजागी चपलांचा व दगडांचा खच पडू लागला होता. परिस्थिती खूपच चिघळली, तेव्हा दुपारी काळी काळ बोपखेलमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. दुपारनंतर परिस्थिती तणावपूर्ण, मात्र पोलिसांच्या नियंत्रणाखाली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांची नावे मिळवली. त्यानुसार, धरपकड सुरू करण्यात आली. या घटनेमुळे दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.
..म्हणून रस्ता बंद केला- सीएमई
‘‘बोपखेल, रामनगर आणि गणेशनगर येथील रहिवाशी सीएमईमधून जाणाऱ्या रस्त्यावर संपूर्णपणे अवलंबून नाहीत. त्यांना बाहेर पडण्यासाठी पुणे-नाशिक रस्ता आणि पुणे शहराकडे जाणारा रस्ता हे पर्यायी मार्ग आहेत. सध्या सीएमईमधून जाणारा रस्ता सीएमईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नव्हता. या सर्व गोष्टींचा विचार करूनच उच्च न्यायालयाने, हा मार्ग वापरण्याचा रहिवाशांना हक्क नाही, असा निर्णय दिला. त्यानुसारच हा रस्ता बंद करण्यात येत आहे. असे असले तरी आपत्कालीन परिस्थितीत आणि कोणी गंभीर आजारी असताना त्यांना माणुसकीच्या नात्याने रस्ता वापरू दिला जातो.’’