घुसखोरी करणाऱ्या चीनचे भारतात स्वागत नव्हे, तर विरोध होणार असल्याचे चिनी लोकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. त्यादृष्टीने चिनी मालावर सार्वजनिक बहिष्कार घालावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी शनिवारी केले.
‘सेतू’ या कॉपीराईटच्या क्षेत्रातील संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शब्दार्थ: एका कॉपीराईटरचा प्रवास’ या शरद देशपांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले; त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, ‘सेतू’चे ऋग्वेद देशपांडे, ऋतुपर्ण देशपांडे आदी त्या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले,‘‘चीनच्या घुसखोरीबाबत भारताने निश्चित भूमिका घेतली पाहिजे. या देशात केवळ स्वागत होते, ही चिनी लोकांची समजूत खोडून काढली पाहिजे. नागरिकांनी चिनी मालावर भारतात सार्वजनिक बहिष्कार घालावा.’’ देशपांडे यांच्याविषयी जोशी म्हणाले,‘‘देशपांडे हे स्वभावाने अत्यंत गोड व्यक्तिमत्त्व आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाचा ते एक गुणी विद्यार्थी आहेत. त्यांना परीसस्पर्श लाभला आहे.’’
कुलकर्णी म्हणाले,‘‘देशपांडे यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे आहे. त्यामुळेच त्यातून भावार्थ निघाला. आमच्यासाठी त्यांनी दहा हजार जाहिरातींचे लेखन केले. त्यात त्यांचे भाव आहेत. रोजच रसाळ लिहिणारी ही व्यक्ती आहे. शब्दांच्या जीवावर मोठे होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी त्यांचे पुस्तक एक स्तंभ आहे.’’
उद्योजकांबाबत कुलकर्णी म्हणाले,‘‘भारतातील उद्योजक भक्कम आहेत. ते चीनला उद्योजकतेत गाडू शकतात. इतर कोणत्याही देशाला आव्हान देऊ शकतात. मात्र, चीनच्या लोकांची चिकाटी व श्रम महत्त्वाचे आहेत. त्यांच्या त्या गोष्टी भारतीयांनी घेतल्या पाहिजेत.’’