औद्योगिक वसाहतींमधील वीजपुरवठा अखंडित त्याचप्रमाणे सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभराबरोबरच पुणे विभागातील औद्योगिक विभागांत चोवीस तास कार्यरत असलेली विशेष यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेअंतर्गत वीज यंत्रणेच्या तत्काळ दुरुस्तीसाठी कर्मचारी व उपकरणांनी सज्ज असलेली ‘ब्रेकडाऊन अटेंडिंग व्हॅन’ राज्यातील २५ औद्योगिक विभागात कार्यरत करण्यात आली आहे.
उद्योगांना सध्या चोवीस तास वीजपुरवठा करण्यात येतो. या यंत्रणेत काही बिघाड निर्माण झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी. त्याचप्रमाणे यंत्रणेत बिघाड निर्माण होऊ नये म्हणून सातत्याने उपाययोजना करण्यासाठी ‘महावितरण’कडून औद्योगिक विभागांमध्ये ही यंत्रणा उभारली आहे. पुणे विभागामध्ये भोसरी, आकुर्डी, िहजवडी, चाकण या औद्योगिक वसाहतींबरोबरच राज्यात रबाळे, महापे (कोपरखैरणे), तुर्भे, तळोजा, वागळे इस्टेट, शिरोली, फाईव्ह स्टार, शेंद्रा, वसई, तारापूर-बोईसर, वाडा, अंबड-सतपूर, सिन्नर, जालना, महाड, सातारा, बारामती, अंबरनाथ, डोंबिवली या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
यंत्रणेत कार्यरत असलेली व्हॅन सातत्याने संबंधित भागातच राहणार असून, त्या माध्यमातून पोल टू पोल पेट्रोिलग केले जाणार आहे. या व्हॅनसोबत प्रत्येक पाळीत सात याप्रमाणे तीन पाळीमध्ये एकूण २१ कर्मचारी दुरुस्तीसाठी कार्यरत असतील. या यंत्रणेकडे आवश्यक ती तीस उपकरणे असतील. संपर्काच्या दृष्टीने या व्हॅनमध्ये मोबाईलही असणार आहे. सध्या राज्यातील २५ औद्योगिक विभागांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली असली, तरी येत्या आठवडय़ामध्ये इतर औद्योगिक विभागांमध्येही ही यंत्रणा सुरू करण्यात येईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले आले.