‘कदम कदम बढाये जा’ च्या तालावर स्नातकांची पडणारी शिस्तबद्ध पावले.. संचलन सुरू असताना झालेले ‘सुपर डिमोना’ विमानांचे ‘फ्लाय पास्ट’.. लष्करातील भावी कारकिर्दीसाठी नौदलप्रमुखांनी दिलेला संदेश.. ‘सुखोई’ आणि ‘सारंग’ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके.. अशा वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२४ व्या तुकडीतील स्नातकांनी संचलनाद्वारे लष्करी शिस्तीचे दर्शन घडविले. तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाची शुक्रवारी दीक्षान्त संचलनाने सांगता झाल्यावर स्नातकांनी टोप्या हवेत भिरकावून देत आनंद व्यक्त केला.
प्रबोधिनीच्या १२४ व्या तुकडीतील स्नातकांचे दीक्षान्त संचलन अरुण खेत्रपाल परेड ग्राऊंडवर झाले. नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. जे. एस. सुमन याने या दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व केले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, ‘एनडीए’चे प्रमुख कमांडंट एअर मार्शल के. पी. गिल, उपप्रमुख रिअर अॅडमिरल आनंद अय्यर, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला या प्रसंगी उपस्थित होते. अॅडमिरल डी. के. जोशी यांच्या हस्ते जे. एस. सुमन याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. विक्रांत कुमार याला रौप्यपदक आणि विशाल दहिया याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ‘एन’ स्क्वाड्रनला सवरेत्कृष्ट स्क्वाड्रन म्हणून ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने गौरविण्यात आले.
अॅडमिरल डी. के. जोशी म्हणाले, ‘‘या आव्हानात्मक करिअरची निवड करून तुम्ही पहिला टप्पा पार केला आहे. व्यावसायिकता आणि समर्पण हे या करिअरचे वैशिष्टय़ आहे. यामध्येजिंकण्याची इच्छा पाहिजे. त्यासाठी कोणत्याही संकटांशी दोन हात करण्याची जिद्द ‘एनडीए’मध्ये मिळते. नेतृत्व गुण आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची शक्ती हे या खडतर प्रशिक्षणाचे वैशिष्टय़ आहे. सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या माहितीतून तुमचे स्वत:चे असे विचार तयार होतात. ते तुम्हाला नवा दृष्टिकोन देतात.’’
परदेशी स्नातकांविषयी जोशी म्हणाले, ‘‘एनडीए’तील प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही आला आहात. आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे. तुमच्या देशालाही तुमच्याविषयीचा गर्व असेल.’’
संचलनानंतर हवेत टोप्या भिरकावून स्नातकांनी आपला आनंद व्यक्त केला आणि मित्रांनाही यामध्ये सहभागी करून घेतले. आकाशात झेपावणारी ‘सुखोई’ आणि ‘सारंग’ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना स्नातकांच्या पालकांचेही भान हरपले.
शेतकरीपुत्र होणार लष्करी अधिकारी
नौदलप्रमुख के. डी. जोशी यांच्या हस्ते कांस्यपदक पटकाविणारा विशाल दहिया हा शेतकरीपुत्र आता लष्करी अधिकारी होणार आहे. हरियानाच्या सोनपत जिल्ह्य़ातील जरोटगाव येथील रहिवासी असलेल्या विशाल याने राई येथील मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स येथे शिक्षण घेतले. तेथील कॅप्टन (निवृत्त) व्ही. के. वर्मा यांनी त्याला ‘एनडीए’विषयीची माहिती दिली. सरांनी दिलेल्या माहितीमुळे मला प्रेरणा मिळाली आणि आता पदकविजेता म्हणून येथून बाहेर पडताना मनस्वी आनंद होत आहे, असे विशाल दहिया याने सांगितले.