लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाचखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी एक नवीन मोबाइल अॅप सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना व्हिडिओ, ऑडिओच्या माध्यमातून लाचखोरांबद्दलची माहिती या विभागाला देता येणार आहे. त्या आधारे संबंधित लाचखोरावर कारवाई शक्य होणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी चिंचवडला दिली. भ्रष्टाचार मोडून काढण्याचा निर्धार करत तक्रारीसाठी नागरिक पुढे आल्यामुळेच १२४५ जणांवर कारवाई करणे शक्य झाल्याचे सांगत यासंदर्भातील कायद्यात लवकरच बदल होतील, असेही त्यांनी सूचित केले.
चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने आयोजित शिशिर व्याख्यानमालेत ‘भ्रष्टाचार संपवता येईल का’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, सहायक आयुक्त प्रकाश शिंदे, संस्थेचे अध्यक्ष संजय खानोलकर आदी उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, शासनाचे जवळपास ४० विभाग आहेत. मात्र, असा एकही विभाग की जिल्हा नाही, ज्या ठिकाणी कारवाई झाली नाही. सर्वाधिक तक्रारदार पुढे आल्याने पुण्यात जास्त प्रमाणात कारवाई झाली. नागरिकांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास बसल्यास, यंत्रणेचे काम अधिक सुटसुटीत झाल्यास आणि आधुनिक ज्ञान स्वीकारून ‘ऑनलाइन’सारख्या माध्यमातून काम सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार कमी होईल. या विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईचा सविस्तर तपशील दीक्षितांनी या वेळी दिला. उत्पन्न स्रोतापेक्षा जास्त संपत्ती आढळून आलेल्यांवर कारवाई करून १३३ कोटी अपसंपदा उघडकीस आणली, असे सांगत नागरिकांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन मधुराज शिवापूरकर यांनी केले. महावीर सत्यान्ना यांनी आभार मानले.
‘जितका शिक्षित, तितका भ्रष्ट’
वर्षभरातील कारवाईत १२४५ जण पकडले गेले. त्यात अपंग, अत्याचार झालेल्या महिला, शासनाकडून मदत मिळणाऱ्या घटकांकडूनही पैसे खाणारे अनेक महाभाग सापडले. उच्च अधिकारी, डॉक्टर, अभियंता, वैद्यकीय अधिकारी, वास्तुविशारद, सरपंच, नगरसेवक, तलाठी, पोलीस अशा अनेकांवर कारवाई झाली. जितका शिकलेला, तितका भ्रष्ट असे सूत्र या कारवाईतून दिसून आले, अशी टिपणी दीक्षित यांनी या वेळी केली.