लाचलुचपत प्रतिबंधक कारवायांसंदर्भात ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काढले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई केली आहे. केवळ राजकीय आकसापोटी ही कारवाई होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही कारवाई राजकीय आकसापोटी होत नसल्याचे स्पष्ट केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तपासामध्ये गैरव्यवहार आढळून आले आहेत, त्यावरून ही कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला काही पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणामध्ये छगन भुजबळ हे दोषी असल्याचे आढळले आहे. त्यावरूनच ही कारवाई सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भुजबळ यांच्यावर होत असलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीमध्ये मतभेद आहेत का, असे फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले. यासंदर्भात राष्ट्रवादीमध्ये दोन मते आहेत हे मला तुमच्याच बोलण्यावरून समजते आहे. याबाबत मला काही माहीत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यावरही कारवाई होणार का, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, असे सूचक उद्गार काढले. मात्र, जेथे पुरावे आढळतील तेथे कारवाई निश्चितपणे केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.