आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता
शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीत बनावट मतपत्रिका छापल्याप्रक रणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ाचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून आता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. बनावट मतपत्रिकांबरोबरच संस्थेच्या माजी संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यातील आणखी दोन ते तीनजणांचा बनावट मतपत्रिका छापण्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. संचालकाला पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.
शि. प्र. मंडळीतील बनावट मतपत्रिका तसेच अन्य विषयांच्या अनुषंगाने पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमध्ये दोन वेळा तपास केला. तपासात वेलिंगकर संस्थेमधील बडे प्रस्थ असलेल्या एका संचालकाचा बनावट मतपत्रिका छापण्यात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात शिप्र मंडळीशी संबंधित असलेल्या पुणे आणि मुंबईतील आणखी दोन ते तीनजणांना अटक होण्याची शक्यता एका पोलीस आधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. शिप्र मंडळीच्या पुणे, मुंबई, सोलापूरसह राज्यभरात ६२ संस्था आहेत. मुंबईतील वेलिंगकर, रुईया आणि पोतदार या संस्थादेखील शिप्र मंडळीच्या अखत्यारित येतात. त्यामुळे माजी अध्यक्ष आणि संचालकांनी त्यांच्या अधिकारात प्रवेश (मॅनेजमेंट कोटा) देताना लाखो रुपयांचे गैरव्यवहार केल्याची शक्यता आहे. बनावट मतपत्रिकांबरोबरच आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीदेखील मध्यंतरी शिप्र मंडळीतील गैरव्यवहारांविषयी माहिती घेतली होती. बनावट मतपत्रिका छापल्याप्रक रणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीची मार्च महिन्यात निवडणूक पार पडली. निवडणुकीत बनावट मतपत्रिका छापण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिप्र मंडळीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अभय दाढे, जयंत शाळीग्राम, अनंत माटे, प्रकाश जोशी यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
शि. प्र. मंडळीच्या निवडणुकीतील मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे असणे अपेक्षित असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत अ‍ॅड. अभय दाढे यांच्याकडे काही मतपत्रिका सापडल्या. धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याने बनावट मतपत्रिकांसंदर्भात पोलिसांकडे फिर्याद देणे गरजेचे होते. मात्र, दुसऱ्या पॅनेलमधील एका उमेदवाराने पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याची भूमिकादेखील संशयास्पद आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.