कालवा फुटीतील दोनशे कुटुंबांना ‘लोकसत्ता’तील वृत्तानंतर गृहोपयोगी साहित्य

दांडेकर पूल भागातील कालवा फुटल्यानंतर अनेकांचे संसार वाहून गेले. मोलमजुरी करून कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यादेखत वाहून गेला. त्यानंतर तीन युवकांनी पुढाकार घेऊन दांडेकर पूल भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी ‘पैसे नको; ताट-वाटी द्या’ या उपक्रमाचे आयोजन केले. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर तसेच त्यासंबंधी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर दात्यांनी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे केला आणि दात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दोनशे कुटुंबांना पुरेल एवढे गृहोपयोगी साहित्य जमा झाले.

दांडेकर पूल भागातील कालवा गेल्या महिन्यात फुटल्यानंतर अनेक कुटुंबांकडे जेवणाशाठी ताट, वाटी, चमचा काहीही नव्हते. त्यामुळे ‘ पैसे नको; ताट, वाटी, चमचा द्या’ असे आवाहन  साने गुरूजी प्राथमिक शाळा आणि रावसाहेब पटवर्धन शाळेच्या माजी विद्यार्थी दलाचे अध्यक्ष अविनाश खंडारे, अनिवाश रायरीकर, दीपक गायकवाड यांनी केले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’त ३१ सप्टेंबर रोजी ‘रविवारची बातमी’ या सदरात प्रसिद्ध झाले. समाजातील वैशिष्टय़पूर्ण तसेच सामाजिक कामांची दखल या सदरातून घेतली जाते.

‘पैसे नको; ताट-वाटी द्या’, या उपक्रमाबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या उपक्रमासाठी अनेक दात्यांनी सहकार्य केले. याबाबत अविनाश खंडारे म्हणाले,की ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. संबंधित वृत्तात आमचे मोबाइल क्रमांक नमूद करण्यात आले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळी सात वाजल्यापासूनच आमच्या मोबाइल क्रमांकावर अनेकांनी संपर्क साधायला सुरुवात केली. आम्ही काय मदत करु शकतो, अशी विचारणा केली. गेल्या बारा दिवसांत या उपक्रमाला दात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

साने गुरुजी स्मारकात अनेक  जण प्रत्यक्ष आले आणि त्यांनी मदत दिली. एकूण साहित्यापैकी ९८ टक्के साहित्य आम्हाला आणून देण्यात आले आहे. ७५० ताटे, ५५० वाटय़ा, ६५० पेले, दोन हजार चमचे, ६० कळशा , ४० बादल्या आम्हाला मदत म्हणून मिळाल्या. लष्कर भागातील केअर टेकर संस्थने दीडशे पातेली दिली. आझम कॅम्पसने शंभर पळ्या, पंचवीस बादल्या उपलब्ध करून दिल्या, असेही खंडारे यांनी सांगितले.

या साहित्याचे वाटप शुक्रवारी साने गुरुजी स्मारकाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण प्रशासक मंडळाचे अध्यक्ष शरद जावडेकर, दिलावर खान, अ‍ॅड. संपत कांबळे, वर्षां गुप्ते, दामिनी पवार, साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला कांबळे, रावसाहेब पटवर्धन शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा हजारे आदींची उपस्थिती होती.

गृहोपयोगी साहित्याबरोबरच शैक्षणिक साहित्याचीही मदत

‘लोकसत्ता’चे वाचक संवदेनशील असल्याची प्रचिती आम्हाला आली. विशेष म्हणजे आम्ही गृहोपयोगी साहित्य देण्याचे आवाहन  केले होते, पण अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी दप्तरे, वह्य़ा, रबर, कंपास, पेन्सिल असे साहित्य दिले आहे. सहाशे ते सातशे वह्य़ा आम्हाला मिळाल्या आहेत. बारा दिवसांत आम्ही उद्दिष्ट गाठू शकलो, याचे श्रेय ‘लोकसत्ता’ला आहे, असे अविनाश खंडारे, अविनाश रायरीकर, दीपक गायकवाड यांनी नमूद केले.