23 April 2019

News Flash

आधार केंद्रांवरील टोकनची दलालांकडून विक्री

आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्रांची वानवा गेल्या सहा महिन्यांपासून शहर आणि जिल्ह्य़ात आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून शहर आणि जिल्ह्य़ात आधार केंद्रे ठप्प झाल्याचे चित्र एकीकडे असताना सुरू असलेल्या आधार केंद्रांवर नोंदणी व दुरुस्तीच्या कामांसाठी दलालांची लॉबी कार्यरत झाली आहे. खासगी कंपन्यांनी सामान्य नागरिकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून कामे काढून घेण्यात आली. तसेच आधार नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी जिल्हा प्रशासनाने दिली. मात्र, आधार केंद्रांवर नोंदणी व दुरुस्तीसाठी आधी घ्याव्या लागणाऱ्या टोकनचीच विक्री करण्यासाठी दलाल पुढे सरसावले आहेत.

आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्रांची वानवा गेल्या सहा महिन्यांपासून शहर आणि जिल्ह्य़ात आहे. आधारची कामे करणाऱ्या खासगी कंपन्यांनी सामान्य नागरिकांकडून शुल्क घेण्यास सुरुवात केल्याच्या असंख्य तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या. त्यानंतर राज्य शासनाने खासगी कंपन्यांकडून कामे काढून सरकारी महा ऑनलाइन कंपनीकडे कामे सोपविली. मात्र, महा ऑनलाइनला आधारची प्रचंड यंत्रणा न झेपल्याने आधार केंद्रांचा गोंधळ सुरू आहे. तसेच केंद्र सरकारच्या आदेशानंतर मोबाइल सीमकार्ड, बँक व्यवहार, प्राप्तिकर विवरण, शाळा व महाविद्यालय व रुग्णालय अशा सर्वच व्यवहारांसाठी आधार बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे मुळातच शहरात कमी असलेल्या आधार केंद्रांवर नागरिकांची एकच गर्दी होत आहे. त्याकरिता केंद्रांवर आधारच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरुवातीला टोकन दिले जाते. टोकनवर करण्यासाठीचा दिवस, वेळ निश्चित करून दिली जाते. केंद्रांवरील नागरिकांची झुंबड कमी होऊन कामे मार्गी लागावीत, असा या मागचा उद्देश आहे.

आधारची सेवा पूर्णत: मोफत दिली जाते, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले असून सामान्य नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, शारीरिक दुर्बल व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष आधार केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांच्या सुविधेसाठी ‘दूरध्वनी करा आणि सशुल्क आधार सेवा मिळवा’ सुरू करण्यात आली आहे. प्रति आधार कार्डकरिता पाचशे रुपये दर आकारण्यात येणार आहेत.

दलालांवर र्निबध नाही

शहरातील अनेक आधार केंद्रांवर आठवडय़ाचा पहिला दिवस म्हणून सोमवारी टोकनचे वाटप केले जाते. केंद्रांवर टोकन घेण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होते. अनेकांची कामे केवळ आधारमुळे अडलेली असल्याने दलालांची लॉबी कार्यरत झाली आहे. कामाच्या निकडीनुसार टोकन विकण्यात येत आहे. या दलालांना कोणत्याही प्रकारचा धरबंद राहिलेला नाही. टोकन देताना आधार केंद्रांच्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची विचारणा किंवा खातरजमा करण्यात येत नाही. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावले आहे.

First Published on November 30, 2017 2:28 am

Web Title: broker issue in aadhar center