पीएमपी प्रशासनाची माहिती; सेवा रस्ता, पदपथ, सायकल ट्रॅकसाठी मार्गिका

सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे प्रवासी सुरक्षितता लेखापरीक्षण करण्यात येणार असून या लेखापरीक्षणात त्रुटी आढळून आल्या नाहीत तर या मार्गावरील सेवा तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील वाहतुकीची आवश्यकता लक्षात घेऊन सन २००६-०७ मध्ये बीआरटी मार्ग उभारण्याचे निश्चित करण्यात आले. स्वारगेट परिसरातील जेधे चौक ते कात्रज स्थानक या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला. सेवा रस्ता, पदपथ, सायकल ट्रॅक आणि अन्य वाहनांसाठी मार्गिका या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सध्या स्वारगेट चौक ते कात्रज चौक या सातारा बीआरटी मार्गाची पदपथ आणि सायकल मार्गाची पुनर्बाधणी होणार आहे. सातारा रस्त्यावरील प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटी मार्ग करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल १०० कोटींचा खर्च केला होता. पुनर्रचनेसाठी आता ७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे पीएमपी प्रशासनाकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे. पीएमपी प्रशासनाच्या अंदाजपत्रकानुसार ही कामे एप्रिल महिन्याअखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पुनर्रचनेअंतर्गत सातारा रस्त्यावरील कामे पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून बीआरटी मार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर या कामांचे प्रवासी आणि मार्गाची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचा स्वतंत्र अहवाल करण्यात येईल. या लेखापरीक्षण अहवालात मार्ग योग्य असल्याचा निर्वाळा मिळाल्यानंतरच या मार्गावर सेवा सुरू करण्यात येणार आहे. तर, काही त्रुटी निदर्शनास आल्यास मार्ग सुरू करण्यापूर्वी त्या दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.