संगमवाडी बीआरटी मार्ग नवीन असल्यामुळे या नव्या सेवेची माहिती प्रवाशांना होण्यासाठी आणि अधिकाधिक संख्यने पीएमपीकडे प्रवासी वळावेत यासाठी या मार्गावर एक महिना सवलत देणे आवश्यकच आहे. त्यामुळे महापालिका आणि पीएमपीने यापूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे ही सवलत महिनाभर सुरू ठेवावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचने केली आहे.
संगमवाडी मार्गावरील नवीन बीआरटीची माहिती प्रवाशांना व्हावी यासाठी एक महिना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, ही सवलत आठच दिवस द्यावी अशी सूचना बीआरटीच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. पिंपरी महापालिकेने रावेत बीआरटी मार्गावर अशाप्रकारची प्रवासी सवलत दोनच दिवस देऊ केली आहे. मात्र ही सवलत देखील महिनाभर सुरू ठेवावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचने केली आहे.
या मागणीचे पत्र संघटनेने प्रशासनाला दिले असून सवलत देणे आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बीआरटी मार्गाची माहिती प्रवाशांना होण्यासाठी आणि पीएमपीकडे प्रवासी वळवण्यासाठी ही सवलत दिली जावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.