सातारा व सोलापूर रस्त्याच्या पाठोपाठ नगर रस्ता तसेच आळंदी रस्त्यावर बीआरटी प्रकल्प कार्यान्वित करण्याची योजना महापालिकेने आखली असली, तरी आता पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिलेल्या आदेशानुसार नव्या मार्गाच्या सुरक्षिततेबाबतचे परीक्षण झाल्यानंतरच या मार्गावर बीआरटी सुरू करता येणार आहे. त्यासाठीचा ठराव स्थायी समितीत बुधवारी मंजूर करण्यात आला.
नगर रस्ता व आळंदी रस्त्यावर बीआरटी मार्गाची चाचणी यापूर्वीच झाली असून तेथील बस थांब्यांवर आता स्वयंचलित दरवाजेही बसवले जाणार आहेत. दरवाजे बसवण्याच्या कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे बुधवारी ठेवण्यात आला होता. या दोन कोटी ३६ लाखांच्या कामाला समितीने मंजुरी दिल्याचे समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बीआरटीच्या या दोन मार्गाची लांबी १६ किलोमीटर असून मार्गावर २२ थांबे आहेत. या थांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची योजना आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
आधी सुरक्षितता, नंतर बीआरटी
हा प्रस्ताव मंजूर करतानाच नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेसंबंधीचे तांत्रिक परीक्षण करावे व त्याचा अहवाल करून घ्यावा असाही प्रस्ताव समितीत आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. या मार्गावरील थांबे रस्त्याच्या मध्यभागी असून त्यांची रचना लेव्हल बोर्डिग अशा स्वरूपाची आहे. मात्र, संपूर्ण मार्ग व थांबे यांच्या सुरक्षिततेसंबधी तज्ज्ञ संस्थेकडून परीक्षण करून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. परदेशी यांनी गेल्या पंधरवडय़ात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. तसा अहवाल एक महिन्यात आला पाहिजे आणि तो येईपर्यंत बीआरटी सुरू करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात सुरक्षिततेबाबतच्या वस्तुस्थितीचा अभ्यास न करताच या मार्गावर बीआरटी सुरू करण्याचे महापालिका व पीएमपीचे नियोजन होते.