िपपरीतील बीआरटी मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी असतानाही केवळ ‘पाहुणा’ ठरत नसल्याने वारंवार उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर पडत आहे. १ऑगस्ट, १५ ऑगस्टनंतर आता पुन्हा एकदा ५ सप्टेंबरला उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदस्यांनी बीआरटीविषयी वेगवेगळय़ा शंका उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती केली.शहरातील ‘बीआरटी’ रस्ते सुरू होणार असल्याची घोषणा टिंगलीचा विषय होऊ लागला आहे. शहरात ४५ किलोमीटर अंतर असलेले चार बीआरटी रस्ते आहेत. त्यापैकी सांगवी-किवळे हा महामार्गावरून जाणारा बीआरटी रस्ता तयार आहे. प्रारंभी १ ऑगस्ट व नंतर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त धरून उद्घाटन होणार होते, मात्र पाहुणे न ठरल्याने दोन्ही मुहूर्त चुकले. राष्ट्रवादीची सत्ता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटनाचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. मात्र, त्यांची वेळ मिळत नसल्याची अडचण सांगितली जाते. राज्यात युतीची सत्ता असल्याने भाजप-सेनेच्या नेत्यांनाही आमंत्रित करावे, अशीही मागणी आहे. पाच सप्टेंबरला अजितदादांचा िपपरी दौरा आहे. त्यामध्ये या कार्यक्रमाचा समावेश करण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांचा होकार आलेला नाही. पुणे आणि िपपरीतील बीआरटीचे एकत्रित उद्घाटन करण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले जाते.दरम्यान, सोमवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीस महापौर, आयुक्तांसह उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, गटनेते सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, सहशहर अभियंता राजन पाटील, पीएमपीच्या मयूरा िशदेकर आदी उपस्थित होते. या वेळी नगरसेवकांनी बीआरटीची सुरक्षितता, त्यासाठी विविध विभागांचा समन्वय, बसचालकांचे प्रशिक्षण, होणारा खर्च, नंतरचे सातत्य आदी मुद्दय़ांवर विविध प्रश्न उपस्थित केले. आयुक्तांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. उद्घाटनाची संभ्रमावस्था कायम असताना ३१ ऑगस्टला पुन्हा सर्वाचा मिळून पाहणी दौरा होणार आहे.