पुणे व िपपरी महापालिका तसेच राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी आंतरराष्ट्रीय बीआरटीएस परिषद पुणे परिसरात घेण्याचे नियोजन असून त्यासाठी होणारा खर्च विभागून करण्यात येणार आहेत. याबाबतच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव िपपरी पालिकेच्या १४ जूनला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.

केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालय व जागतिक बँकेच्या साहाय्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणेसाठी बीआरटीएस प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटर लांबीचे चार रस्ते विकसित करण्यात येत आहेत. त्यापैकी सांगवी ते किवळे व नाशिक फाटा ते वाकड या दोन रस्त्यावर बीआरटी बससेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सर्वात स्वस्त, लवकर अंमलबजावणी होणारा आणि जास्त भागात सेवा पुरवणारा हा पर्याय आहे. नवीन तंत्रज्ञान, तांत्रिक बाबी, प्रवाशांच्या सुविधा, त्यामधील अत्याधुनिक बाबी यासंबंधी केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व अनुभव मिळण्यासाठी दर दोन वर्षांनी तीन दिवसांकरिता अशाप्रकारची परिषद आयोजित करण्यात येते. पहिल्या वर्षी २०१२ मध्ये झालेल्या परिषदेत १५ देशांमधून २५० प्रतिनिधी सहभागी झाले. दुसऱ्या परिषदेस २५ देशांतील २०० पेक्षा अधिक प्रतिनिधींचा सहभाग होता. यंदा पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे व िपपरी महापालिका तसेच राज्य सरकार संयुक्तपणे खर्च करणार आहे. या परिषदेमुळे दोन्ही शहरांतील ‘रेनबो बीआरटीएस’ला जागतिक पातळीवरील अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.