गुन्हे शाखेकडून उलगडा ; प्रियकर अटकेत

पुणे : लोहगाव भागात एका मोकळ्या मैदानावर मृतावस्थेत सापडलेल्या युवतीच्या खूनप्रकरणाचा उलगडा गुन्हे शाखेकडून करण्यात आला. युवतीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून केला, तसेच ओळख पटू नये म्हणून मृतदेह पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आला. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा माग काढला. या प्रक रणी प्रियकरला अटक करण्यात आली आहे. विवाहासाठी तगादा लावल्याने त्याने तिचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

अयोध्या सुदाम वैद्य (वय २५, सध्या रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ  रा. जुने हत्तेश्वर मंदिर, हातगाव, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. या प्रकरणी बालाजी ऊर्फ गुरुजी वैजनाथ धाकतोडे (वय २७, सध्या रा. मुंजोबा वस्ती, धानोरी, मूळ रा. आदर्श कॉलनी, अंबाजोगाई, जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अनिकेत सुनील खंडागळे (रा. सिद्धार्थनगर, लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे. अयोध्या वैद्यचा विवाह झाला होता. तिचे दोन विवाह झाले होते. पण विवाहानंतर तिचे पतीशी पटत नसल्याने ती विभक्त झाली होती. त्यानंतर ती भोसरी परिसरात स्थायिक झाली होती. एका कंपनीत ती काम करत होती. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तिचे आरोपी बालाजीशी अनैतिक संबंध होते. बालाजी विवाहित आहे. तो एका केशकर्तनालयात कामाला होता.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्याने विवाह करण्यासाठी तगादा लावला होता. पत्नीला घटस्फोट दे, माझ्याबरोबर विवाह कर, असे तिने त्याला सांगितले होते. या कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. तिने पत्नीला अनैतिक संबंधाची माहिती देईन, अशी धमकी दिल्याने बालाजीने तिच्या खुनाचा कट रचला. गुरुवारी (१० मे) रात्री बालाजीने अयोध्याला दुचाकीवरून लोहगाव भागातील मोकळ्या जागेत नेले. त्याच्याबरोबर साथीदार अनिकेत होता. तिघांनी तेथे दारू प्याली.

त्यानंतर तीक्ष्ण शस्त्राने वार करून अयोध्याचा खून केला. आरोपींनी बाटलीतून आणलेले पेट्रोल मृतदेहावर ओतून पेटवून दिला. त्यानंतर रात्री उशिरा बालाजी घरी आला आणि त्याने पत्नीला तातडीने गावाला जायला सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (११ मे) सकाळी लोहगाव भागात अर्धवट जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून समांतर तपास सुरू करण्यात आला. पसार झालेला आरोपी बालाजी हडपसर भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून पकडण्यात आले.

पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, युवराज नांद्रे, लक्ष्मण शिंदे, संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, प्रवीण शिंदे, राजेश रणसिंग, माणिक पवार, सुनंदा भालेराव, स्नेहल जाधव यांनी ही कारवाई केली.

हातावरील गोंदणावरून युवतीची ओळख पटली

मृतावस्थेत सापडलेल्या अयोध्या वैद्यची सुरुवातीला ओळख पटलेली नव्हती. तिचा मृतदेह पूर्णपणे जळाला होता. हातावर इंग्रजीत अयोध्या आणि ए. बी. असे गोंदविण्यात आले होते. पोलिसांनी त्या अक्षराच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक तपास तसेच फेसबुकवर असलेले अयोध्याचे खात्याची पडताळणी करून तपास करण्यात येत होता. तेव्हा आरोपी बालाजीशी तिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.