खासगी केबल कंपन्यांना त्यांच्या कामांसाठी रस्ते खोदाईसाठीची मुदत आणखी तीनच दिवस शिल्लक असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी ही मुदत खरोखरच पाळली जाणार का आणि महापौरांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढील पंधरा दिवसांत शहरातील खोदलेले सर्व रस्ते पूर्ववत होणार का या आदेशानंतरही प्रश्न तसाच राहणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीएसएनएल, रिलायन्स, महाराष्ट्र नॅचरल गॅस यांसह अन्यही कंपन्यांना शहरात रस्ते खोदाईला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना दिलेल्या परवानगीएवढी खोदाई अद्याप झालेली नाही. मुळातच शहरभर सुरू असलेली कंपन्यांच्या केबलसाठीची खोदकामे तसेच महापालिकेची सुरू असलेली कामे यामुळे वाहतुकीचे मोठे प्रश्न शहरातील अनेक रस्त्यांवर उद्भवत आहेत. त्या बरोबरच महापालिकेची रस्ते काँक्रिटीकरणाचीही कामे अनेक ठिकाणी सुरू असून त्यामुळेही अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कंपन्यांकडून यापुढेही खोदाई सुरू राहिल्यास आणि रस्ते पूर्ववत न झाल्यास पावसाळ्यात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी संबंधितांची बैठक घेऊन ३० एप्रिलपर्यंतच रस्ते खोदता येतील, असे स्पष्ट केले आहे.
महापालिकेची जी कामे शहरात सुरू आहेत, त्या कामांसाठीही ३० एप्रिलपर्यंतचीच मुदत देण्यात आली असली, तरी काँक्रिटीकरणाची एवढी कामे शहरात सुरू आहेत की ती येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तसेच महापालिकेच्या अन्य खात्यांची जी कामे शहरात सुरू आहेत, ती पूर्ण करून त्यानंतर रस्ते पूर्ववत केव्हा होणार हाही प्रश्न आहे.
खासदार-आयुक्त बैठक
खासदार अनिल शिरोळे यांनीही शहरात सुरू असलेल्या खोदाईबाबत महापालिका आयुक्तांना एक पत्र दिले असून त्यांनी या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही बैठक २ मे रोजी निश्चित केली असून त्या दिवशी ही बैठक होईल. रस्ते खोदाईचे दिनांक व महिने यांची कायमसाठी निश्चिती करा आणि तसा धोरणात्मक निर्णय घ्या, ही खासदार शिरोळे यांची प्रमुख मागणी असून अन्यही काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. खोदाई केल्यानंतर एखादा रस्ता किती कालावधीत पूर्ववत केला जावा याचाही कालावधी निश्चित केला जावा, वेगवेगळ्या ठिकाणी जी खोदाई केली जाते त्याचे शुल्क निश्चित केले जावे अशाही मागण्या शिरोळे यांनी केल्या आहेत. या विविध मुद्यांवर २ मे रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल.