भारत संचार निगम मंडळाच्या (बीएसएनएल) मनोऱ्याची बॅटरी चोरटय़ांनी लांबविली. सिंहगड रस्त्यावरील बीएसएनएल दूरध्वनी केंद्राच्या आवारात ही घटना घडली.
बीएसएनएलच्या तांत्रिक विभागातील कर्मचारी गिरिधर खोपडे (वय ५३) यांनी या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर दातार फार्मनजीक बीएसएनएलचे कार्यालय आहे. तेथे बीएसएनएलचा मोबाइल सेवेसाठी मनोरा (टॉवर) आहे. चोरटय़ांनी मनोऱ्याच्या बॅटरी चोरून नेल्याचा प्रकार नुकताच घडला. खोपडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलीस शिपाई निगडे तपास करत आहेत.

शहरात झालेल्या घरफोडय़ांमध्ये बारा लाखांचा ऐवज लंपास
पुणे : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. कोरेगाव पार्क आणि वडगांव बुद्रुक येथे या घटना घडल्या.
सलीम शेख (वय ३६, रा. कोरेगाव पार्क) यांनी या संदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख हे व्यावसायिक आहेत. कोरेगाव पार्कमधील मीरानगर सोसायटीत ते राहायला आहेत. शेख हे मूळचे गोव्याचे रहिवासी आहेत. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे ते कुटुंबीयांसोबत गोव्याला गेले होते. चोरटय़ांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ९० हजार रुपये आणि दागिने असा आठ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
शेख कुटुंबीय सहा मे रोजी गोव्याहून पुण्यात आले. तेव्हा त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलीस उपनिरीक्षक एम. एच. तडवी तपास करत आहेत. वडगाव बुद्रुक येथील समर्थ पार्क सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी कपाटातील पावणेदोन लाख रुपये आणि दागिने असा तीन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सोमवारी (९ एप्रिल) सकाळी ही घटना घडली.